esakal | कर्जमुक्तीत ३३८ कोटींचा निधी वाटप : पालकमंत्री सत्तार
sakal

बोलून बातमी शोधा

abdul sattar

महाविकास आघाडीचे शासन सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत अतिवृष्टी, पूर, गारपिटीतील नुकसानग्रस्त २१ हजार ८०० शेतकऱ्यांना दहा कोटी ४९ लाख रुपयांची मदत झाली.

कर्जमुक्तीत ३३८ कोटींचा निधी वाटप : पालकमंत्री सत्तार

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे, ता. २७: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४४ हजार ५७९ शेतकऱ्यांना ३३८ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. अशा शेतकऱ्यांना पुन्हा पीककर्ज वितरणाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार २६ हजार १५ शेतकऱ्यांना १२४ कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाले. गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५२ हजार ७५२ शेतकऱ्यांना ४४९ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज वितरित झाले. गेल्या काही वर्षांतील कर्ज वितरणातील हा उच्चांक आहे, अशी माहिती पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. 
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा क्रीडासंकुलात मंगळवारी सकाळी नऊनंतर शासकीय मुख्य ध्वजवंदन झाले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, आमदार मंजुळाताई गावित, महापालिकेचे आयुक्त अजीज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. नंतर क्रीडा पुरस्कार वितरण, गुणवंतांचा सत्कार आणि कोरोना विषाणूच्या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव झाला. 

जिल्ह्यातील कामगिरी 
पालकमंत्री म्हणाले, की महाविकास आघाडीचे शासन सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत अतिवृष्टी, पूर, गारपिटीतील नुकसानग्रस्त २१ हजार ८०० शेतकऱ्यांना दहा कोटी ४९ लाख रुपयांची मदत झाली. आत्महत्याग्रस्त १७ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाची मदत झाली. रब्बी हंगामात तीन हजार ९६६ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. खरीप हंगाम २०२० साठी ५९ हजार ३२१ शेतकऱ्यांनी ४९ हजार ६८३ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला आहे. कापसावरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून १३ हजार ६६४ कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती घरापासून वंचित राहू नये म्हणून 
महाआवास अभियानात १२ हजार ७७ घरांचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ६८ हजार १३८ गरजू नागरिकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन थाटात साजरा झाला. शासकीय, निमशासकीय संस्था, शाळा- महाविद्यालये, विविध संस्था, संघटना सहभागी झाल्या. 

पालकमंत्री सत्तार यांची माहिती... 
- धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात 
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भरीव निधी 
- कोरोना विषाणूवर लस आली, खबरदारी बाळगणे आवश्यक 
- नागरिकांनी नियमितपणे मास्क वापरणे आवश्यक 
- जिल्ह्यात दोन लाख २० हजार १९५ क्विंटल कापसाची खरेदी 
- २०२०-२१ साठी ५४ लाखांचा संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार 
- ७७ गावे व ३३ वाड्यांसाठी ११० उपाययोजना प्रस्तावित 
- जिल्ह्यात १४ हजार ३६७ वैयक्तिक वनहक्क दावे पात्र 
- आतापर्यंत १४ हजार ३५६ वनपट्ट्यांचे वाटप 

संपादन ः राजेश सोनवणे