esakal | धुळ्यात प्रत्‍येकाच्या घरापर्यंत गॅस पाइपलाइन; मार्चपासून होणार कामाला सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

gas connection

केंद्र शासनाने धुळे शहर व जिल्ह्यासाठी हा प्रकल्प मंजूर केला आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकनंतर धुळे जिल्ह्यात हा प्रकल्प येत आहे. या प्रकल्पामुळे घरगुती ग्राहकांना पाइपद्वारे घरापर्यंत गॅस मिळेल तसेच वाहनधारकांनाही गॅसचा पुरवठा केला जाईल.

धुळ्यात प्रत्‍येकाच्या घरापर्यंत गॅस पाइपलाइन; मार्चपासून होणार कामाला सुरवात

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : शहरासह जिल्ह्यात सीएनजी-पीएनजी गॅस पाइपलाइन प्रकल्पाचे काम येत्या मार्चपासून हाती घेणार असून मार्च- २०२२ पर्यंत हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित होईल, अशी माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी (ता.१०) पत्रकार परिषदेत दिली. 
गॅस पाइपलाइन प्रकल्पाबाबत माहिती देण्यासाठी डॉ. भामरे यांनी राम पॅलेस येथे पत्रकार परिषद घेतली. महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीचे डायरेक्टर राजेश पांडे, मॅनेजिंग डायरेक्टर एस. हैदर, संदीप श्रीवास्तव आदी उपस्थित होते. 
खासदार डॉ. भामरे म्हणाले की, धुळे शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक घरात पाइपलाइनद्वारे गॅस पोचविण्याचे आम्ही आश्वासन दिले होते, हे आश्‍वासन पूर्ण करत आहोत. 

मुंबई, पुणेनंतर धुळ्यात प्रकल्‍प
केंद्र शासनाने धुळे शहर व जिल्ह्यासाठी हा प्रकल्प मंजूर केला आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकनंतर धुळे जिल्ह्यात हा प्रकल्प येत आहे. या प्रकल्पामुळे घरगुती ग्राहकांना पाइपद्वारे घरापर्यंत गॅस मिळेल तसेच वाहनधारकांनाही गॅसचा पुरवठा केला जाईल. एमआयडीसीतील उद्योग, व्यापारासाठीदेखील याचा उपयोग होईल. येत्या वर्षभरात हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. 

मनपा जागा उपलब्ध करेल 
या प्रकल्पासाठी संबंधित कंपनीला जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जागा निश्चितीसाठी महापालिका आयुक्तांसोबत पुढील आठवड्यात बैठक घेतली जाईल, असे महापौर श्री. सोनार म्हणाले. श्री. पांडे व इतर अधिकाऱ्यांनीही प्रकल्पाची माहिती दिली. शिरपूर तालुक्यात महामार्गापासून जवळच हा प्रकल्प उभारला जाणार असून सर्वात प्रथम धुळे शहरातील नागरिकांसाठी ही सुविधा सुरू केली जाईल. त्यासाठी शहरात गॅसची स्वतंत्र पाइपलाइन टाकली जाईल. 
 
गॅस अत्यंत सुरक्षित 
गृहिणींना २४ तास घरापर्यंत गॅस उपलब्ध होईल. हा गॅस हवेत विरघळणारा असल्याने अतिशय सुरक्षित आहे. गॅसमुळे स्फोट होण्याचा कोणताही धोका नाही. शिवाय पर्यावरणपुरक असल्याने प्रदूषण रोखण्यासही मदत होईल असे डॉ. भामरे म्हणाले. सध्या मिळत असलेल्या एलपीजी गॅसपेक्षा हा गॅस स्वस्त राहणार असल्याने पैशांचीही बचत होईल, असे डॉ. भामरे म्हणाले.  

संपादन ः राजेश सोनवणे

loading image