नगरपंचायत निवडणुकीचा साक्रीत लवकरच बिगुल 

धनंजय सोनवणे
Wednesday, 3 February 2021

नगरपंचायतीच्या पहिल्या पाच वर्षांची मुदत २६ नोव्हेंबरला संपली आहे. त्या दिवसापासून सध्या नगरपंचायतीवर प्रशासक कार्यरत आहे. दरम्यान, दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गेल्या नोव्हेंबरमध्येत प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढली होती,

साक्री (धुळे) : गेल्या काही दिवसांपासून इच्छुकांसह तालुकावासीयांचे लक्ष लागलेल्या नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्यांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. यानुसार या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदारयादी १५ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार आहे, तर १ मार्चला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. यामुळे साक्री नगरपंचायतीची निवडणूक लवकरात होण्याची शक्यता आहे. 
येथील नगरपंचायतीच्या पहिल्या पाच वर्षांची मुदत २६ नोव्हेंबरला संपली आहे. त्या दिवसापासून सध्या नगरपंचायतीवर प्रशासक कार्यरत आहे. दरम्यान, दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गेल्या नोव्हेंबरमध्येत प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढली होती, मात्र त्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही निवडणुकीबाबत कुठलीही स्पष्टता होत नसल्याने इच्छुकांमध्ये घालमेल होती. 

इच्छुकांची आतापासून तयारी
अशातच आता मंगळवारी निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्यांचा कार्यक्रम घोषित झाल्याने निवडणूकही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांची प्रतीक्षा संपणार असून, एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष मतदान होण्याची शक्यता असल्याने इच्छुक उमेदवार त्यादृष्टीने आता कामाला लागले आहेत. 

महाविकास आघाडी होणार? 
राज्यात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून येथील निवडणूक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढविण्याची शक्यता आहे. शहरात अनेक वर्षांपासून नेतृत्व करणारे विद्यमान सत्ताधारी गटाचे गटनेते ज्ञानेश्वर नागरे लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच ते उतरण्याची शक्यता असून, निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होऊ शकते. मात्र जागावाटपात एकमत न झाल्यास श्री. नागरे स्वतंत्र आघाडी स्थापन करूनही निवडणुकीत उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी निवडणुकीची पूर्वतयारी केली असून, पाच वर्षांत शहरात केलेल्या विकासकामांचा अजेंडा मतदारांसमोर ठेवूनच ते निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. दु‍सऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचीही निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना झाली आहे. गेल्या पाच वर्षांतील सत्ताधाऱ्यांच्या उणिवा, शहरातील रखडलेली कामे आणि भाजपचे व्हिजन लोकांसमोर मांडून सत्ता मिळविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news sakari nagar panchayat election