esakal | साक्रीत दोन दिवसांपासून लसीकरण ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

co vaccine

साक्रीत दोन दिवसांपासून लसीकरण ठप्प

sakal_logo
By
टिम इ सकाळ

साक्री (धुळे) : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना त्यावर नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत असून याचाच भाग म्हणून प्रतिबंधात्मक लसीकरणावरही भर दिला जात आहे. मात्र ही लस पुरेशी उपलब्ध होत नसल्याने हे लसीकरण वारंवार ठप्प होत आहे. लसअभावी शहरातील लसीकरण दोन दिवसांपासून पूर्णपणे ठप्प असून ही लस कधी उपलब्ध होईल याबाबत कुठलीही माहिती उपलब्ध होत नसल्याने काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनावर परिणामकारक असणारी प्रतिबंधक लस घेण्यासाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. यात शहरात ग्रामीण रुग्णालय येथे शासकीय लसीकरण केंद्र सुरू असून याशिवाय आणखी अन्य दोन खासगी लसीकरण केंद्र सुरू आहेत. या सर्व ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते आहे. यातच एक तारखेपासून अठरा वर्षाच्या पुढील सर्वांचे लसीकरण होणार असल्याने त्यानंतर मात्र या गर्दीत आणखी भर पडणार आहे. मात्र लसीच्या पुरेशा उपलब्धतेअभावी लसीकरण वारंवार ठप्प होते आहे.

खासगी केंद्रावरही लस नाही

ग्रामीण रुग्णालयात गेल्या आठवड्यात लसीचा अत्यल्प पुरवठा झाल्याने दिवसभरात केवळ एक ते दोन तास लसीकरण होत होते, तर गेल्या दोन दिवसांपासून हे लसीकरण पूर्णपणे बंद आहे. ग्रामीण रुग्णालयातच लस उपलब्ध झाली नसल्याने खासगी लसीकरण केंद्रांनाही ती मिळू शकलेली नाही. पर्यायाने शहरातील लसीकरण पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे लसीचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

आधी रेमडेसिव्हिर नाही; आता लस नाही

दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुका सर्वाधिक प्रभावित झाल्याचे दिसून येत असून जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण संख्या ही साक्री तालुक्यात दिसून येते आहे. कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही तालुक्यात अधिक दिसून येत असताना परिस्थिती सुधारण्याच्या प्रयत्नात प्रशासनासोबत लोकप्रतिनिधीही कमी पडताना दिसून येत आहेत. आधी कोरोनाबधितांना बेड, ऑक्सिजन मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला, त्यानंतर रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. आता लसीकरण सुरू झाले असताना लस मिळत नाही. एकूणच सर्वच बाबतीत तालुक्यातील लोकांचे हाल होत असून यात गांभीर्याने लक्ष घालून तालुकावासीयांना दिलासा देण्याची गरज व्यक्त होत आहे.

loading image