सावित्रीच्‍या लेकीचा वारसा; सुनेलाही केले शिक्षिका अन्‌ घडविले शंभर शिक्षक

जगन्नाथ पाटील
Sunday, 3 January 2021

आशाबाई ठाकरे या निवृत्त शिक्षिका राहतात. २००७ मध्ये त्या निवृत्त झाल्या तरीही निवृत्तीनंतर एक तपापासून गोरगरीब मुलांसाठी शिक्षणाची गंगा पोचविण्याचे त्यांचे काम सुरूच आहे.

कापडणे (धुळे) : महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिकविल्याने भारतातील प्रत्येक घरातीलच महिलांच्या शिक्षणाला अभूतपूर्व चालना मिळाली. महात्मा फुले यांच्या ‘घरातील एक स्त्री शिकली, तर ती पूर्ण घरालाच पुढे नेते’ या म्हणण्यानुसार धुळे शहरातील आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षिकेने विद्यार्थ्यांना तर घडविलेच; पण घरातील तीन मुलींसह सुनेलाही शिकवून शिक्षिकाच केले. विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या सासूने शिकवून शिक्षिका केले. हे उत्तरदायित्त पूर्ण करण्यासाठी त्यांनीही सुनेला शिकवून शिक्षिका केले. यामुळे सावित्रीमाईंचा शिक्षणाचा वसा जपणारे व शिक्षकांना घडविणारे ठाकरे कुटूंब आगळेवेगळे ठरले आहे. 
धुळे शहरातील नकाणे रस्ता परिसरात आशाबाई ठाकरे या निवृत्त शिक्षिका राहतात. २००७ मध्ये त्या निवृत्त झाल्या तरीही निवृत्तीनंतर एक तपापासून गोरगरीब मुलांसाठी शिक्षणाची गंगा पोचविण्याचे त्यांचे काम सुरूच आहे. त्यांचे पती निवृत्त आदर्श शिक्षक श्याम ठाकरे आहेत. निवृत्तीनंतर ते योगशिक्षक बनून योगाचे धडे देत आहेत. आशाबाई पाटील यांनी तिन्ही मुलींना शिक्षिकाच केले आहे. विशेष म्हणजे त्यांचे जावईही शिक्षकच आहेत. शिक्षणासारखे पवित्र काम नाही, हे ओळखूनच त्यांनी जीवनात शंभरावर शिक्षक तयार केले आहेत. 

सत्‍तरच्या दशकात त्‍यांना केले शिक्षिका
सौ. ठाकरे यांना सासूबाईंनी सत्तरच्या दशकात शिकवून शिक्षिका केले. म्हणून त्यांनीही वैशाली ठाकरे या सुनेला शिकवून शिक्षिका बनविले आहे. मुलींचे चार नातू आणि एक नात अशा पाच नातवंडांना जवळ ठेवून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी चालना दिली. दरम्यान, ठाकरे यांनी शिक्षणाचे अविरत काम करीत असतानाच स्वार्थाबरोबर परमार्थ साधला. त्या सांगतात, की महिलांनी रांधा, वाढा व उष्टी काढा, याच्यात जीवन वाया घालवू नये. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभे राहावे. एका महिलेने दुसरीला चालना दिली पाहिजे. सावित्रीबाई फुलेंच्या कार्यातूनच प्रेरणा मिळते. नाही सावू होता आले, पण त्यांचे कार्य सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news savitribai fule son in low teacher thakarey family