esakal | मिठात आयोडिन कमी; साठा केला सील
sakal

बोलून बातमी शोधा

solt

आरोग्य विभागामार्फत वर्षातून दोनदा किराणा दुकानांवर विक्री होणाऱ्या मिठातील आयोडिनची तपासणी केली जाते. जानेवारीमध्ये आरोग्याधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी सहकाऱ्यांसह ग्रामीण भागातील दुकानांवरून मिठाचे नमुने घेतले होते.

मिठात आयोडिन कमी; साठा केला सील

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : तालुक्यातील चार गावांमधील किराणा दुकानातून घेतलेल्या मिठाच्या नमुन्यात आयोडिनचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा कमी आढळल्याने पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने मिठाचा साठा सील केला. या संदर्भात वरिष्ठांना अहवाल सादर केल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी यांनी दिली. 
आरोग्य विभागामार्फत वर्षातून दोनदा किराणा दुकानांवर विक्री होणाऱ्या मिठातील आयोडिनची तपासणी केली जाते. जानेवारीमध्ये आरोग्याधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी सहकाऱ्यांसह ग्रामीण भागातील दुकानांवरून मिठाचे नमुने घेतले होते. धुळे येथील जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत या नमुन्यांची तपासणी केली. त्यात वकवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या बोराडी, होळनांथे केंद्रांतर्गत हिसाळे व अजंदे बुद्रुक, तर विखरण आरोग्य केंद्रांतर्गत भामपूर येथील एका दुकानातील मिठाच्या नमुन्यात आयोडिनचे प्रमाण १५ टक्क्यांहून कमी आढळले. तेथील दुकानदारांना संबंधित ब्रॅन्डच्या मिठाची विक्री तातडीने थांबविण्याचे आदेश देऊन साठा सील केला. 

एकाच ब्रॅन्डचा साठा 
आरोग्य विभागाने घेतलेल्या नमुन्यांत निकषांनुसार आयोडिन नसलेले मीठ पद्मावती साल्ट प्रा.लि. या कंपनीचे आहे. बोराडी येथील नमुन्यात ११.४४, हिसाळे येथील नमुन्यात १२.७०, अजंदे बुद्रुक येथील नमुन्यात ६.३५, तर भामपूर येथील नमुन्यात ११.६४ टक्के आयोडिन आढळले. पोषक घटकांअभावी होणाऱ्या आजारांपासून बचाव होण्यासाठी मिठात आयोडिनचे प्रमाण १५ टक्के असणे आवश्यक आहे. मात्र संबंधित कंपनीच्या मिठात निकषांपेक्षा कमी आयोडिन आढळल्याने साठा सील केला. या कंपनीतर्फे तालुक्यात आणखी कुठे मिठाची विक्री झाली याबाबत तपास सुरू आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे