गाडीत कोरोना नसतो का भाऊ.. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून नियमांकडेही दुर्लक्ष 

passenger traveling
passenger traveling

शिरपूर (धुळे) : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विवाह सोहळे, अंत्यसंस्कार, दशक्रिया विधींसह गर्दी होणारे लहान-मोठे समारंभ अधिकाऱ्यांच्या रडारवर आहेत. दंडात्मक कारवाई सुरू आहे. प्रशासकीय दक्षतेच्या पार्श्वभूमीवर एसटी बसमधून सर्व नियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. 
कोरोनामुळे परिवहन महामंडळाने बससेवा दीर्घकाळ बंद ठेवली. नंतर अनेक नियमांना अनुसरून बस सुरू झाल्या. एका सीटवर एक प्रवासी, निर्जंतुकीकरण, मास्कचा वापर आदी बाबींकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आले. मात्र, हळूहळू सर्वच घटकांमध्ये कोरोनाविषयक बेफिकिरी आली. त्याला परिवहन महामंडळही अपवाद नाही. सध्या तर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून वाहतूक सुरू असून, प्राथमिक नियमांकडेही दुर्लक्ष केले जात आहे. 

गाडीत कोरोना नाही का?
बसमध्ये ज्यांना कोरोनाच्या गांभीर्याची कल्पना आहे, असेच प्रवासी मास्क लावून बसलेले आढळतात. उर्वरित मात्र कोरोना नष्ट झाल्याच्या आविर्भावात किंवा जिवावर उदार झालेले दिसून येतात. काही जण वाहकाने तंबी दिल्यावर तोंडाला रूमाल बांधतात. मात्र, नंतर काढून ठेवतात. अतिरिक्त प्रवासी भरल्यामुळे अनेकदा दोन प्रवाशांची क्षमता असलेल्या आसनावर तीन जण बसलेले पाहायला मिळतात. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सच्या नियमाला पुरता हरताळ फासला जात आहे. खच्चून भरलेल्या बसमध्ये कोरोनाचा एक रुग्ण असेल, तर किती जण संसर्गित होऊ शकतील याचा विचार होणे आवश्यक आहे. 

धुळे- शिरपूर बसचे त्रांगडे 
धुळे आगारातून रात्री आठनंतर धुळे- शिरपूर बसफेऱ्यांची संख्या मर्यादित असते. अनेकदा पुरेसे प्रवासी उपलब्ध असतानाही एकच बस उपलब्ध होत असल्याचा अनुभव आहे. सोनगीर, नरडाणा, शिरपूर मार्गांवरील गावांमधील प्रवासी बसमध्ये दाबून भरले जातात. बसस्थानकाशिवायही प्रत्येक बस स्टॉपवरील प्रवासी स्वीकारले जातात. त्यामागे आगाराचा आर्थिकदृष्ट्या व्यवहारी विचार असला, तरी कोरोनाच्या संसर्गाची शक्यताही कितीतरी पटीने वाढू शकते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आगारातर्फे वाहकांना नियमांचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या जाणे अपेक्षित आहे. प्रशासनाने अन्य कारवायांसोबतच बस थांबवून कोरोनाविषयक नियमांचे पालन होत आहे किंवा नाही हे तपासणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यावर संबंधितांवर दंडात्मक कारवाई केल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दिशेने निश्चितच सकारात्मक संदेश देणे शक्य होणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com