शेतकरी कुटूंब हादरले..गोठ्याला आग दोन गायींसह खत, बैलगाडी खाक 

short circuit fire
short circuit fire

म्हसदी (धुळे) : तामसवाडी (ता. साक्री) येथील शिवारात सोमवारी (ता. ८) दुपारी लघुदाब वाहिनीच्या शार्टसर्किटच्या आगीत चाऱ्यासह बैलगाडी, शेडमधील दोन गायी, शेती अवजारे, मळणी यंत्र व रासायनिक खते खाक झालीत. सुमारे दोन लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. 
तामसवाडी येथील नवल निकम यांच्या शेतात सोमवारी दुपारी चारा भरलेल्या बैलगाडीजवळ शार्टसर्किटमुळे आग लागली. बैलगाडीत कोरडा चारा असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले व पत्र्याच्या शेडमध्यील कोरडा मका व ज्वारीच्या चाऱ्याने पेट घेतला. आगीत शेडमधील दोन गायी, दोन ट्रॅक्टर मका चारा, मळणी यंत्र, शेती अवजारे व रासायनिक खते जळून खाक झाले. तलाठी महेश सूर्यवंशी व कोतवाल साहेबराव वाघ यांनी पंचनामा केला. 

बैलगाडीतील चाऱ्यामुळे मोठे नुकसान 
लघुदाब वीज वाहिनी जात असलेल्या शेतात कोरडा चारा असलेली बैलगाडी उभी होती. शार्टसर्किटमुळे ठिणगी पडल्याने कोरड्या चाऱ्याने पेट घेतला. लघुदाब वीज वाहिनीच्या ताराखाली चारा भरलेली बैलगाडी उभी नसती तर ही दुर्घटना घडली नसती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. शेवाळी येथील वीज उपकेंद्रांचे कनिष्ठ अभियंता समाधान पाटील, कर्मचारी आर. डी. पवार, संदीप सावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. सरपंच प्रतिनिधी उमाकांत अहिरराव, माजी सरपंच मधुकर अहिरराव, संजय अहिरराव, पोलिसपाटील वाघ उपस्थित होते. 

शेतकरी कुटुंब हादरले 
आगीत कोरडा चारा, बैलगाडी, मळणी यंत्र, दोन गायी, शेती अवजारे व रासायनिक खते खाक झाल्याने शेतकरी कुटुंब हादरले आहे. सुमारे दोन लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याने काय करावे, अशी चिंता शेतकरी निकम यांना सतावत आहे. दोन्ही गायी गर्भार होत्या. आगीने रौद्र रूप धारण केल्याने गायींनी हंबरडा फोडला. लगतच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. तोपर्यंत चारा व गायी जळून खाक झाल्या. नुसत्या गायींची किंमत लाखभर असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गायी, कोरडा चारा आणि शेतीपयोगी साहित्य खाक झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. 
 
लघुदाब वाहिनीच्या तारा एकमेकांशी घासल्यामुळे ठिणगी पडल्याने आग लागली आहे. वीज वाहिनीपासून जनावरे व चारा बाजूला ठेवावा. 
-समाधान पाटील, कनिष्ठ अभियंता, वीज उपकेंद्र, शेवाळी 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com