सोनगीर ग्रामपंचायतीचे उत्पन्न होणार दुप्पट; काय आहे कारण 

एल. बी. चौधरी
Saturday, 26 December 2020

धुळ्याच्या भोपाळ इलेक्ट्रिक ट्रान्समिशन कंपनीला २००९-१० मध्ये ग्रामपंचायतीने सुमारे ११६ एकर जागा दिली. कंपनी बखळ जागेचे भाडे २० पैसे चौरस फुटाप्रमाणे वार्षिक सात लाख ७५ हजार रुपये ग्रामपंचायतीला देत होती.

सोनगीर (धुळे) : धुळ्याच्या भोपाळ इलेक्ट्रिक ट्रान्समिशन कंपनीला येथील ग्रामपंचायतीने गट क्रमांक ५२ मधील ४६ हेक्टर गावठाण जागा दिली आहे. ग्रामपंचायतीने दिलेल्या जागेपेक्षा कंपनीने अधिक जागा बळकावून घेतल्याचे समजते. शिवाय मोठ्या प्रमाणात बांधकाम झाले असून, भव्य कंपाउंड बांधले आहे. त्यामुळे कंपनीचे बांधकाम व जागेचे नव्याने मोजमाप करणे आवश्यक होते. यामुळे ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे यांनी तपासणी व मोजमाप केले. बखळ जागेचे व बांधकामाचे वेगवेगळे दर ग्रामपंचायत वसूल करते. त्यामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न दुप्पट होणार आहे. 
धुळ्याच्या भोपाळ इलेक्ट्रिक ट्रान्समिशन कंपनीला २००९-१० मध्ये ग्रामपंचायतीने सुमारे ११६ एकर जागा दिली. कंपनी बखळ जागेचे भाडे २० पैसे चौरस फुटाप्रमाणे वार्षिक सात लाख ७५ हजार रुपये ग्रामपंचायतीला देत होती. मात्र, कंपनीने २०११-१२ मध्ये इलेक्ट्रिक स्ट्रक्चर व पक्के बांधकाम केले. त्या काळी बांधकामाचे दर एक रुपया चौरसफूट होते. तरीही कंपनीने बांधकाम जागेचे दर वाढवून दिले नाहीत. पुढे बखळ जागेचे भाडे वाढून कंपनी ४० पैसे चौरसफुटाप्रमाणे वार्षिक २० लाख ५० हजार रुपये ग्रामपंचायतीला देते. मात्र, सध्याचे बांधकामाचे चार रुपये चौरसफूट दर कंपनीने देण्यासाठी मोजमाप झाले व कंपनीने वार्षिक किमान ५० लाख रुपये द्यावेत, अशी मागणी ग्रामविकास अधिकारी बोरसे यांनी केली. 

कंपनीकडून आश्‍वासन पुर्तता नाही
कंपनीने स्वतःच्या फायद्यासाठी काही शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे रस्तेही बंद केले. मात्र, तेही सहन करण्यात आले. कंपनीने दर वर्षी गावविकासासाठी ठोस काम करण्याचे तसेच गावाला २४ तास वीज देण्याचे व गावातील बेरोजगार युवकांना कामे देण्याचे आश्वासन पाळले नाही. मात्र, आता जागेचे वाढीव भाडे देणे कंपनीला बंधनकारक आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात दुप्पट वाढ होईल. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news songir gram panchayat land rent double bhopal electric company