
गावापासून दूर, एकांतात, आजूबाजूला गर्द झाडी, समोर जामफळ धरण, एका बाजूला मुंबई-आग्रा महामार्ग, तर दुसऱ्या बाजूला टेकड्यांची रांग अशा डोळे सुखावणाऱ्या परिसरात भारत स्काउट आणि गाइडचे नाशिक विभागीय केंद्र
सोनगीर (धुळे) : गेल्या ३० वर्षांत २० हजारांहून अधिक स्काउट-गाइडच्या विद्यार्थी व शिक्षकांना प्रशिक्षित करणाऱ्या येथील निसर्गरम्य परिसरातील राज्य स्काउट-गाइड प्रशिक्षण केंद्राला अखेरची घरघर लागली आहे. येथील जामफळ धरण विस्तारात प्रशिक्षण केंद्र येत असल्याने ते लवकरच हटविण्यात येणार असून, केंद्राचा वीज व पाणीपुरवठा यापूर्वीच बंद झाला आहे. प्रशिक्षण केंद्रास शासनाने पर्यायी व चांगली जागा द्यावी, अशी मागणी आहे.
गावापासून दूर, एकांतात, आजूबाजूला गर्द झाडी, समोर जामफळ धरण, एका बाजूला मुंबई-आग्रा महामार्ग, तर दुसऱ्या बाजूला टेकड्यांची रांग अशा डोळे सुखावणाऱ्या परिसरात भारत स्काउट आणि गाइडचे नाशिक विभागीय केंद्र असून, विभागात अन्य कुठेही नाही. केंद्राचे एक भव्य सभागृह, कार्यालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय, स्वच्छतागृह, कवायत मैदान, तंबू रोवण्यासाठी सिमेंटचे चौथरे, प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य, राहुटीचे साहित्य, शिवाय स्वयंपाकाचे साहित्य, विविध कौशल्य साहित्य, प्रोजेक्ट, पुस्तके, होकायंत्र आदी आजही ‘जैसे थे’ आहे.
१९९० पासून सुरवात
स्काउट प्रणेते स्वातंत्र्यसैनिक व्यंकटराव रणधीर, टी. पी. महाले, बी. एच. बाविस्कर, जे. यू. ठाकरे, आशाताई रंधे यांच्या प्रयत्नाने १९८७ मध्ये प्रशिक्षण केंद्रास मान्यता मिळाली. बांधकाम होऊन १९९० मध्ये पहिले प्रशिक्षण दिले. केंद्र नावारूपाला आणण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील स्काउट-गाइडचे एक आवडीचे डेस्टिनेशन झाले. प्रशिक्षणासह एक दिवसाच्या सहलीसाठी शाळांचेही आवडते व प्रसन्न ठिकाण झाले. पुढे बी. जे. रायते व एम. टी. गुजर यांनीही केंद्राचा विकासात योगदान दिले.
एक वर्षापासून प्रशिक्षणाचे काम बंद
केंद्रावर स्काउट आणि गाइडचे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी निवासी प्रशिक्षण दिले जाते. यात बेसिक, अॅडव्हान्स, राज्य पुरस्कार परीक्षा, विविध शाळांचे कॅम्प, तालुका व जिल्हास्तरीय मेळावे, महिलांसाठी निवासी गाइड प्रशिक्षण होते. पंतप्रधान ढाल व राष्ट्रपती पुरस्कार परीक्षेचा पाया निर्माण करण्याचे कार्यही येथे होते. मात्र गेल्या एक वर्षापासून धरणाच्या कामामुळे स्काउट व गाइडचे प्रशिक्षण बंद पडले आहे. पाणी व वीजपुरवठा खंडित झाला आहे. वॉचमन व त्याचा परिवार अनेक अडचणींना तोंड देत तेथे राहत आहे.
शासन निर्णयाची प्रतिक्षा
जिल्ह्यातील स्काउट-गाइड चळवळ उभी करण्यात मोठे कष्ट घ्यावे लागले. आता ते कार्य थंडावू नये म्हणून स्काउट-गाइड प्रशिक्षण केंद्राला पर्यायी जागा मिळावी, अशी मागणी आहे. त्यासाठी सोनगीरजवळच महामार्गालगत, वाघाडी मार्गाला लागून, लळिंग घाटात, गोंदूर तलावाजवळ अशा चार ठिकाणी जागेची मागणी केली आहे. शासनाने अद्याप निर्णय दिलेला नाही. शक्यतोवर सोनगीरजवळच जागा द्यावी, अशी मागणी आहे.
राज्य स्काउट-गाइड प्रशिक्षण केंद्राची स्थापना, निर्मिती व विकासासाठी अनेकांनी आयुष्य वेचले. त्यांपैकी अनेक महात्मे आज हयात नाहीत. प्रशिक्षण केंद्र धरणामुळे विस्थापित होत आहे. अनेक वर्षे हे केंद्र जिल्ह्यासाठी वैभवाचे ठिकाण होते. ते लवकरच पाण्यात जाईल. केंद्राला शेवटचा निरोप देताना मनाला खूप वेदना होत आहेत. नवीन केंद्रात सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात ही अपेक्षा.
- एम. टी. गुजर, स्काउट- गाइड जिल्हा सहाय्यक सरचिटणीस तथा माजी स्काउट उपायुक्त सोनगीर
संपादन ः राजेश सोनवणे