esakal | गावातील कुटुंबे अचानक झाले गर्भश्रीमंत; म्‍हणे खोदकाम करताना सापडले सोने
sakal

बोलून बातमी शोधा

gold

जुने राहते घर पाडून नवीन घर बांधताना काही सापडेल, या अपेक्षेने घरमालक खोदकाम ठिकाणी बसून राहतो. अनेकांनी घर बांधण्यापूर्वी भगत वा ज्योतिषाकडून काही मिळेल का जाणून घेतले आहे

गावातील कुटुंबे अचानक झाले गर्भश्रीमंत; म्‍हणे खोदकाम करताना सापडले सोने

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : येथील सुवर्णगिरी प्राचीन किल्ल्याच्या नावावरून गावाला सोनगीर नाव पडले. नावाप्रमाणेच सुवर्णाचा स्पर्शही गावाला झाला आहे की काय, येथील अनेक कुटुंबांना सोने, सोन्याची नाणी व दागिने सापडल्याची चर्चा आहे. त्यात तथ्य कितपत आहे हे सांगता येणार नाही, पण फारसे प्रयत्न न करता अचानक काही कुटुंबे गर्भश्रीमंत झाली आहेत, हे नक्की. सध्या गावात सोने सापडल्याची अशीच चर्चा असून, अनेक जण मोबाईलवरून विचारपूस करीत आहेत. यात अफवा की तथ्य काही कळायला मार्ग नाही. 
जुने राहते घर पाडून नवीन घर बांधताना काही सापडेल, या अपेक्षेने घरमालक खोदकाम ठिकाणी बसून राहतो. अनेकांनी घर बांधण्यापूर्वी भगत वा ज्योतिषाकडून काही मिळेल का जाणून घेतले आहे. दर वर्षी असे कुठेना कुठे धन सापडल्याची चर्चा होते. गावात काहींची अचानक परिस्थिती सुधारली की त्यांना धन सापडले आहे, असे काही छातीठोकपणे सांगतात. आजपर्यंत जवळपास शंभरावर कुटुंबांबाबत अशी चर्चा झाली आहे. मात्र, धन किंवा सोने सापडल्याचे कधीच सिद्ध झाले नाही आणि कोणी तसा प्रयत्नही केला नाही. 

सोनगीरचा इतिहास 
सुवर्णगिरी किल्ल्याचे जहागीरदार राजा उग्रसेनकडे खूप सोने असल्याचे सांगितले जाते. पारंपरिक लघुउद्योगाचे गाव म्हणून सोनगीरची श्रीमंती सर्वत्र होती. गावात अनेकांकडे मोठ्या प्रमाणात सोने होते, म्हणून सोनगीर म्हणजे सोन्याचा पर्वत किंवा राशीवरूनही गावाचे असे नाव होते. पूर्वी चोर, डाकूंपासून धन सुरक्षित राहावे, म्हणून अनेक कुटुंबे घरात मोठे खड्डे खोदून सुवर्ण नाणी व धन त्यात ठेवत असत. काहींनी मोठमोठे तळघर खोदले होते. त्यात धान्य भरले जायचे. आजही काही घरांचे बांधकाम करताना तळघरे सापडतात. किल्ल्यावर दही, दूध तसेच धान्य ठेवण्यासाठी भले मोठे कुंभ बनविले होते. तत्कालीन इतिहासाच्या खुणा आजही कायम आहेत. रथघरामागे खोदताना असे कुंभ सापडले होते. त्या काळी लपविलेले सोने आज काहींना घर बांधताना सापडत असावे, अशी चर्चा आहे. मात्र, यात काही तथ्य, तर काही निव्वळ अफवा असू शकतात. 

आताच चर्चा का? 
येथे एकाला घर बांधकाम करताना सोने सापडल्याची एक महिन्यापासून चर्चा आहे. त्यात कितपत तथ्य आहे हे कोणालाच माहीत नाही. मात्र, एका सायंदैनिकाने चर्चेला बळ दिले. बातमी वाचून चर्चेत अधिकच वाढ झाली. अनेकांनी मोबाईलवर विचारणा केली. मात्र, याबाबत माहिती खरी असल्याचे कोणीच छातीठोकपणे सांगत नाही. 

अफवांचा बाजार गरम 
गावातील जवळपास शंभरावर कुटुंबांबाबत धन सापडल्याची चर्चा होते, तर काहींबाबत अफवाही पसरविण्यात आल्या. एखाद्याची झटपट श्रीमंती काहींच्या डोळ्यात खुपत असल्याने ते मुद्दामहूनच अशी अफवा फैलावून देतात, तर काही घरांच्या बांधकामात अडथळा निर्माण व्हावा, म्हणून अशा अफवा पसरवतात. सध्याची अशीच अफवा असणे शक्य आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image
go to top