esakal | Success story : घरोघरी रेशन, मास्‍क वाटले; कष्‍ट करत घरच्यांना हातभार लावत यशाला गवसणी, यूपीएससी परीक्षेत यश
sakal

बोलून बातमी शोधा

upsc exam nilesh

शहरात मिल परिसरातील शेलारवाडीत वास्तव्यास असलेले निलेशचे आजोबा भुरा दगा मासुळे (रा. सडगाव, ता. धुळे) मिल कामगार, तर वडील संतोष मासुळे यांनी कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी विविध व्यवसाय करून गाडा चालविला.

Success story : घरोघरी रेशन, मास्‍क वाटले; कष्‍ट करत घरच्यांना हातभार लावत यशाला गवसणी, यूपीएससी परीक्षेत यश

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : शहरातील श्रमिक, कष्टकऱ्यांचा परिसर अशी ओळख असलेल्या मिल परिसरातील निलेश मासुळे या तरुणाने लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात असिस्टंट कमांडट अर्थात सहाय्यक पोलिस आयुक्तपद मिळविले आहे. 

शहरात मिल परिसरातील शेलारवाडीत वास्तव्यास असलेले निलेशचे आजोबा भुरा दगा मासुळे (रा. सडगाव, ता. धुळे) मिल कामगार, तर वडील संतोष मासुळे यांनी कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी विविध व्यवसाय करून गाडा चालविला. प्रथम रेडिओ दुकानावर काम, नंतर कापड दुकानात सेल्समन, साऊंड सर्व्हिसचा व्यवसाय आणि आता ते केबल ऑपरेटरचा व्यवसाय करत आहेत. घरची ही आर्थिक स्थिती जाणून असलेल्या निलेशने शिक्षणातून प्रगतीचा मार्ग स्विकारला. त्याने प्राथमिक शिक्षण धुळ्यातील जयहिंद प्राथमिक शाळा, नंतर जे. आर. सिटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पुढे नगरच्या विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयातून बीई मेकॅनिकलची पदवी मिळविली. तो इंजिनिअरिंगला प्रथम आला. क्रिकेट, व्हॉलीबॉल, स्केटींग, एनसीसी आदींचीही त्याला आवड होती. 

गुणवत्ता यादीत ६४ वा 
आयपीएस अधिकारी अक्षय हाके यांच्या संपर्कासह मार्गदर्शनाखाली निलेशने यूपीएससीची तयारी सुरू केली. त्यासाठी त्याने पुण्यासह तीन वर्षे दिल्लीत अभ्यास केला. पहिल्या प्रयत्नात तो अनुत्तीर्ण झाला. त्यातील उणिवा भरून काढत पुन्हा अभ्यास सुरू केला. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून दिल्लीत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक म्हणूनही काम केले. त्यातून त्याला दरमहा पाच हजार रुपये मानधन मिळत होते. त्यामुळे हातभार लागला. 

घरोघरी रेशन, मास्‍क वाटले
कोरोनाच्या काळात घरोघरी रेशन वाटप, मास्क बनवून वाटप केले. त्यामुळे निलेशला कोरोना योद्धा पुरस्कारही मिळाला. वडिलांनीही त्याला पैशाची अडचण भासू दिली नाही. स्वयंसेवकाचे कार्य मुलाखतीवेळी कामी आले. अशा खडतर प्रवासातून अखेर निलेशने यूपीएससीत यश मिळविले. युपीएससीच्या माध्यमातून केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या परीक्षेत तो गुणवत्ता यादीत देशात ६४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याला जे. आर. सिटी हायस्कूलचे शिक्षक एन. यू. बागुल, एन. व्ही. नागरे, आर. ओ. निकम, ए. के. चौधरी, तुकाराम गवळी यांनी वेळोवेळी पाठबळ दिले. 

संपादन ः राजेश सोनवणे