
ग्रुपवर दोघेही बालके आमच्या शेतातील पावरा समाजाच्या जागल करणाऱ्या कुटुंबीयांकडे सुरक्षित असून, त्यांचे फोटो टाकत ओळख पटल्यावर संपर्क करावा, असा संदेश व्हायरल केला होता.
दोंडाईचा (धुळे) : येथील शिंदी कॉलनीत मजुरीसाठी आलेल्या पावरा कुटुंबातील दोन बालके रविवारी (ता. ३) दुपारनंतर हरवल्याने दोंडाईचा पोलिस ठाण्याचे प्रभारी परिवीक्षाधीन पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मीडियातून व्हॉट्सॲप ग्रुपवर दोघे बालके हरवल्याची माहिती टाकताच चार ते पाच तासांत दोन्ही बालके सुखरूप वणी (ता. शिंदखेडा) येथे सापडली. भाऊ- बहीण असलेल्या या बालकांना कुमावत यांनी पेढे भरवत त्यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केले.
एकीकडे पोलिस या हरवलेल्या बालकांचा शोध घेत असतानाच वणी येथील संतोष गिरासे यांनी ‘नारायण भाऊसाहेब युवा मंच’ या ग्रुपवर दोघेही बालके आमच्या शेतातील पावरा समाजाच्या जागल करणाऱ्या कुटुंबीयांकडे सुरक्षित असून, त्यांचे फोटो टाकत ओळख पटल्यावर संपर्क करावा, असा संदेश व्हायरल केला होता. या ग्रुपला दोंडाईचा भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण महाजन ॲड. होते. तर दोंडाईचा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक देवीदास पाटील यांच्याकडून महाजन यांच्या दोंडाईचा सोशल ग्रुपला बालके हरवल्याची माहिती आलेली होती. त्यामुळे अवघ्या चार-पाच तासांत महाजनांच्या माध्यमातून पोलिसांच्या तपासाला यश येऊन दोन्ही बालकांना पोलिसांनी रात्री साडेदहाच्या सुमारास वणी शिवारातील शेतातून ताब्यात घेत आई-वडिलांकडे स्वाधीन केले.
...असा लागला तपास
दोघे भाऊ-बहीण रविवारी दुपारनंतर वणी (ता. शिंदखेडा) रस्त्याकडे रडत जात होते. त्या दोघांना काहीच सांगता येत नव्हते. तेव्हा संतोष गिरासे हे आपल्या वणी गावातील आदिवासी पावरा समाजाकडे घेऊन गेले. तेथे दोन्ही बालकांना कोणीही ओळखले नाही. त्यानंतर मंदाणे येथे नेले, मात्र तेथेही ओळख पटली नाही. अखेर त्यांच्या स्वतःच्या शेतातील पावरा समाजाच्या जागल करणाऱ्या कुटुंबाकडे त्यांना सुरक्षित ठेवले. व्हॉट्सॲप ग्रुपवर दोघा मुलांचे फोटो टाकल्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत सोशल मीडियाच्या माध्यमातून हरवलेली बालके मिळून आल्याने पोलिस यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला. यामुळे शहर परिसरातील जनतेत समाधान व्यक्त होत आहे.
संपादन ः राजेश सोनवणे