अस्वस्थ कार्यकत्यांची नेत्यांकडे खलबते! 

nandurbar zp
nandurbar zp

शहादा : राज्याच्या राजकारणात प्रथमच मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतरे होऊन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने सत्ता स्थापन केली. जिल्ह्यातही मिनी मंत्रालयाच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे सहाजिकच राज्याच्या राजकारणाचे पडसाद तालुक्यात उमटत आहेत. वर झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यासंबंधी नेत्यांच्या दारी जाऊन खासगीत कार्यकर्त्यांचे खलबते सुरू आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या या अस्वस्थतेला लवकरच वाचा फुटणार असल्याचे समजते. 

जिल्हा परिषदेशी ग्रामीण जनतेची नाळ जुळलेली असते. साहजिकच निवडणुका लागल्याने सर्वांनी रणशिंग फुकले आहे. परंतु राज्यात सत्तांतराची परिस्थिती पाहता कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे. या अस्वस्थतेची इत्यंभूत माहिती आपल्या नेत्यांजवळ जाऊन कार्यकर्ते चर्चेद्वारे सांगत आहेत. नेत्यांकडूनही लवकरच अस्वस्थतेला वाचा फोडू असे आश्वासन मिळत आहे. 

सत्ता तिथे वलय.... 
राज्यात पाच वर्ष भाजपचे सरकार होते. विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईनचा जयघोष केला. त्यामुळे पुन्हा भाजपचे सरकार येईल या आशावादावर तालुक्यातील अनेकजण भाजपवासी झाले. निवडणुकीत एक दिलाने काम करत आमदारही निवडून आणले. परंतु राज्यात अनेक स्थित्यंतरे होऊन शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस यांची युती होऊन सत्ता स्थापन झाली. सहाजिकच सत्तेत येऊ पाहणारा भाजप सत्तेपासून दूर गेला. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत सरकार स्थापनेचे पडसाद निश्चितच उमटतील, त्याची खदखद कार्यकर्तेही बोलून दाखवत आहेत. भाजपमय झालेला तालुका पुन्हा तसाच राहील का खिंडार पडेल याच्याही उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. 

तालुक्यात पडसाद उमटणार.... 
निवडणुकीदरम्यान काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला तालुक्यात बड्या नेत्यांचे वलय कमी होते. याउलट भाजपमध्ये मात्र नेत्यांची व कार्यकर्त्यांची मांदियाळी होती. भाजपात असलेल्या नेत्यांची मांदियाळी कायम असणार, की जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान त्याला सुरुंग लावून स्फोट घडणार हे सध्या कार्यकर्त्यां दरम्यान सुरू असलेल्या अस्वस्थतेवरुन दिसत आहे. 

तालुका उपाध्यक्षपदाचे दावेदार 
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे राखीव असल्याने सहाजिकच उपाध्यक्षपदासाठी नेत्यांची चढाओढ सुरू असते. शहादा तालुक्यात सर्वाधिक 14 गट व 28 गण आहेत. जिल्हा स्थापनेनंतरच्या इतिहासात गेल्या अडीच वर्षाच्या कालावधी सोडता आजपर्यंत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद शहादा तालुक्याकडे आलेले आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान जिंकण्यासाठी सर्वच कसबपणाला लाऊन नेतेमंडळी निवडणूक आखाड्यात उतरतात भलेही स्वतंत्ररित्या निवडणुका लढवल्या. परंतु जिल्हा परिषदेवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता अबाधित राहिली आहे. 

सत्ता कुणाची येणार? 
यंदा निवडणुकीत प्रथमच जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा रोवण्याची चर्चा सुरू होती. परंतु राज्याच्या राजकारणात उलटापालट झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये वेगळ्याच चर्चेचे स्वरूप ऐकायला मिळत आहेत. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपली सत्ता कायम ठेवते कि जिल्हा परिषदेत सत्तांतर होऊन भाजपाची एक हाती सत्ता येईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com