मराठी ही सर्वसमावेशक भाषा - प्रा. सदानंद मोरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

पुरस्काराचे मानकरी...
सुधाकर गायधनी (अखिल भारतीय श्री दलूभाऊ जैन मारठी साहित्यभूषण पुरस्कार), प्रा. डॉ. सदानंद मोरे (अखिल भारतीय पद्मश्री भवरलाल जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार), डॉ. गिरीश जाखोटीया (सूर्योदय साहित्यगौरव पुरस्कार), अशोक सोनवणे (सूर्योदय साहित्यभूषण पुरस्कार), किशोर पाठक (सूर्योदय बालसाहित्य पुरस्कार), पांडुरंग सुतार (सूर्योदय सेवाव्रती पुरस्कार), सावळीराम तिदमे (सूर्योदय सेवारत्न पुरस्कार), नामदेव कोळी (सूर्योदय काव्य पुरस्कार).

जळगाव - साहित्य हे भाषेतून लिहिले जात असते. पण, भाषा ही मानवनिर्मित आहे. ती आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात प्रवेश करीत असते. याशिवाय कुठे जाऊ शकत नाही. मुळात साहित्य हा भाषेचा व्यवहार असून, भाषा निर्माण करणे आणि बोलण्याची क्षमता मनुष्यात आहे. यातही मराठी भाषा ही सर्वसमावेशक अशी भाषा आहे. यामुळेच मराठी भाषेतील संमेलनदेखील सर्वसमावेशक असल्याचे मत पंधराव्या सर्वोदय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी आज येथे मांडले.

सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त दलूभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित सर्वोदय साहित्य संमेलन आज जैन संघटना सभागृहात झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा. मोरे बोलत होते. संमेलनाचे उद्‌घाटन इतिहासाचे अभ्यासक डॉ. नरसिंह परदेशी यांच्या हस्ते झाले. डॉ. मोरे म्हणाले की, भाषा ही जगण्याला व्यापून उरली आहे. देशात अनेक भाषा आहेत. पण, यातून भांडणदेखील निर्माण होतात. मात्र, यात मराठी भाषा ही अभिजात आहे. कारण, मराठी भाषा ही प्राचीन असण्यासह महाराष्ट्रीय प्राकृत भाषा आहे.

यामुळेच संस्कृत साहित्यात मराठी कविता घेतल्या जातात. असे असले तरीदेखील अकरावी-बारावीकरिता ही प्राकृत भाषा शिकवली जात नव्हती. मात्र, याबाबत शासनाकडे प्रस्ताव मांडल्यानंतर त्यास मान्यता देत या वर्षापासून अकरावीकरिता प्राकृत भाषेचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एका भाषेचे साहित्य दुसऱ्या भाषेत करण्यासाठी भाषांतर केले जाते. पण, हे करताना ते का आणि कशावरून करावे, हे ठरविले जात असते. संस्कृतमधील पहिला ग्रंथ असलेली भगवद्‌गीता असून, हे सर्वांना समजावे याकरिता गीता संस्कृतमधून वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Language is Unanimous Sadanand More