नंदुरबारमध्ये येत्‍या गुरुवारपासून १५ दिवस पूर्णतः संचारबंदी 

nandurbar lockdown
nandurbar lockdown

नंदुरबार : कोविड-१९ संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यात ३१ मार्च मध्यरात्रीपासून १५ एप्रिल मध्यरात्रीपर्यंत पूर्णतः संचारबंदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. 

हे राहणार बंद 
सर्व बाजारपेठा, आठवडेबाजार, इतर अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने, शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, बार्बर शॉप, स्पा, सलून, ब्यूटिपार्लर बंद राहतील. करमणूक उद्याने, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, तरण तलाव, प्रेक्षागृहे, क्रीडासंकुले, मंगल कार्यालये, खुले लॉन्स, सभागृह, असेंबली हॉल बंद राहील. सर्व हॉटेल/ रेस्टॉरंट, लॉजिंग, परमिट रूम, बियर बार व इतर सर्व प्रकारच्या आस्थापना बंद राहतील. सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने व इतर सर्व गर्दी होणारे कार्यक्रम बंद राहतील. धार्मिक व प्रार्थनास्थळे सर्व सामान्यांसाठी बंद राहतील. तथापि धर्मगुरू, पुजारी यांना नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम करता येतील. 

हे राहणार सुरू 
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून औषधांची दुकाने, रुग्णालये पूर्णवेळ सुरू राहतील. भाजी मंडई सकाळी सहा ते अकरा या वेळेत सुरू राहील. मात्र एकाआड एक ओटे राहतील. भाजीपाला आणि किराणा वस्तूंच्या घरपोच सेवेला प्राधान्य देण्यात यावे. दूध वितरकांना सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी सहा ते आठ या वेळेत दूध वितरणास परवानगी असेल. दूध वितरकांनी संबंधित तहसीलदारांकडून ओळखपत्र घेणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कार्यालये, वृत्तपत्र छपाई व वितरणास परवानगी असेल. किराणा आस्थापना सकाळी सहा ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी राहील. पाचपेक्षा अधिक व्यक्ती दुकानात आढळल्यास दंडात्मक कारवाई करून दुकान सील केले जाईल. दुकानासमोरील बाजूस ‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’ असा फलक लावावा व सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी खुणा कराव्यात. सर्व प्रकारची मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेसाठी गॅरेज सुरू ठेवण्यास परवानगी असेल. गॅस वितरण पूर्णवेळ सुरू राहील. पेट्रोलपंप केवळ अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहनांसाठी सुरू राहतील. यासाठी आवश्यक पुरावा संबंधिताने वितरकास दाखविणे आवश्यक आहे. 
 
परीक्षा, शासकीय कार्यालयांना मुभा 
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व मान्यताप्राप्त विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी संबंधित परीक्षा केंद्र, नियुक्त अधिकारी, कर्मचारी, यंत्रणा यांना परीक्षा कामकाजासाठी मुभा राहील. परीक्षार्थींनादेखील मुभा राहील, तथापि त्यांनी ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. अंत्यविधीसाठी २० पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी असणार नाही. सर्व शासकीय कार्यालये, बँका शासकीय वेळेत सुरू राहतील. पोलिस, होमगार्ड, जिल्हा सूचना केंद्र, महावितरण, सशस्त्र दले, अग्निशमन दल, शासकीय धान्य गुदाम, कारागृहे, म्युन्सिपल सेवा कोणत्याही बंधनाशिवाय सुरू राहतील. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोबत ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे. याशिवाय शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील. 

संपादन - राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com