ऑक्‍सीजन लेव्हल कमी झालेल्‍यांनाच रेमडेसिव्हिर द्यावे : डॉ. राजेंद्र भारुड

collector rajendra bharud
collector rajendra bharud

नंदुरबार : कोरोना बाधित आढळणाऱ्या गावात स्थानिक पातळीवर विलगीकरण कक्ष सुरू करण्यात यावे. लक्षणे नसलेल्या आणि ऑक्सिजन पातळी चांगली असलेल्या बाधित व्यक्तीवर उपचार करण्यात यावे. तसेच अधिक रुग्ण आढळलेल्या भागाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले. 

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते. डॉ. भारुड म्हणाले, रॅपीड अँन्टीजन टीमच्या सदस्यांची बैठक घ्यावी आणि कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात पाठविण्याची व्यवस्था करावी. गट विकास अधिकारी यांनी गावातील समाज मंदिर, शाळा, सभागृहात विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी उपाययोजना करावी. ग्रामपंचायतीमार्फत कोरोना बाधितांसाठी जेवणाची व्यवस्था करावी. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. आशा कार्यकर्तीमार्फत ऑक्सिजन तपासणी करावी. शाळेच्या मुख्याध्यापकांनी विलगीकरण कक्षाचे प्रमुख म्हणून काम पहावे. 
बाधित व्यक्तीला १० दिवस विलगीकरण कक्षात ठेवावे. पुढील महिन्याभरात बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता कोरोना बाधित व्यक्ती कुटुंबासोबत राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. बाधित व्यक्तीची ऑक्सिजन पातळी खालावल्यास जवळच्या कोविड रुग्णालयात संदर्भित करण्यात यावे. 

उपघटना व्‍यवस्‍थापकाची नियुक्‍ती 
अधिक कोरोनाबाधित आढळणाऱ्या गावात उपघटना व्यवस्थापकाची नियुक्ती करावी. या अधिकाऱ्याने विलगीकरण कक्ष आणि तेथील व्यवस्थेचा दैनंदिन आढावा घ्यावा. अशा सेविकांमार्फत संपर्क साखळी शोधण्याचा प्रयत्न करावा. नियोजनबद्ध पद्धतीने ही सर्व कार्यवाही करावी. गट विकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांनी अधिकाधिक विलगीकरण कक्ष सुरू करण्यावर भर द्यावा. विलगीकरण कक्षातील स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. 

बँकेतील गर्दी टाळा
नव्याने येणाऱ्या रुग्णवाहिकांचा उपयोग केवळ कोरोनाबाधित रुग्णांसाठीच करावा. ग्रामपंचायत पातळीवर जनजागृतीवर भर देण्यात यावा. जनता कर्फ्युच्या कालावधीत बाजार भरणाऱ्या गावात निर्जंतुकीकरणाचे काम करावे. गर्दीच्या ठिकाणी भाजीच्या गाड्या उभ्या राहणार नाहीत, त्याऐवजी मोकळ्या पटांगणात उभ्या राहतील याची दक्षता घ्यावी. घटना व्यवस्थापकांनी नव्या क्षेत्रात कोरोना बाधित आढळल्यास त्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करा. बँकेच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे. बँकेत गर्दी होणार नाही याबाबत नियोजन करण्यात यावे. सरकारी कार्यालयातील अभ्यागतांना परवानगी देऊ नये. 
 
दररोज ५ हजार लसीकरणाचे नियोजन 
ऑक्सिजन पातळी खालावलेल्या रुग्णांनाच रेमडेसिव्हिर औषध देण्यात यावे. रुग्णालयाची रेमडेसिव्हिरबाबत मागणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडे मागणी घ्यावी आणि त्यानुसार थेट रुग्णालयांना औषध पुरविण्यात यावे. दररोज ५ हजार व्यक्तींचे लसीकरण करण्याबाबत नियोजन करण्यात यावे. जिल्‍ह्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने तालुका स्तरावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. बैठकीस तहसीलदार, गट विकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

संपादन- राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com