शिधापत्रिकेवरील धान्यासाठी लागणार आधार जोडणी

धनराज माळी
Saturday, 26 December 2020

सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी लाभार्थ्यांच्या आधार व मोबाईल क्रमांकाच्या जोडणीचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी पुरवठा विभागाला सूचना देत

नंदुरबार : सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे धान्याचे मासिक वाटप करताना रास्तभाव दुकानदारांनी ई-पॉस यंत्राद्वारे शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांच्या आधार व मोबाईल क्रमांकाची जोडणी (सीडिंग) करावी लागणार आहे. जानेवारीअखेर सीडिंग नसल्यास धान्य मिळण्यात अडचण येणार आहे. 
सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी लाभार्थ्यांच्या आधार व मोबाईल क्रमांकाच्या जोडणीचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी पुरवठा विभागाला सूचना देत, रास्तभाव दुकानदार व पुरवठा निरीक्षक यांना आधार व मोबाईल सीडिंगबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. ३१ जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांच्या आधार व मोबाईल क्रमांकाचे सीडिंग न झाल्यास त्यांना देण्यात येणारे धान्य पुढील महिन्यापासून आधार सीडिंग होईपर्यंत निलंबित करण्यात येईल व याची जबाबदारी संबंधित तहसीलदार, पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि पुरवठा निरीक्षकांवर निश्‍चित करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या पात्र लाभार्थ्यांनी आधार व मोबाईल क्रमांक सीडिंग झाले नसल्यास रास्तभाव दुकानदारांशी संपर्क साधून सीडिंग करून घ्यावे, असे आवाहन केले आहे. 

तहसील कार्यालयांनी जोडणी न झालेल्या लाभार्थ्यांची रास्तभाव दुकाननिहाय यादी तयार करून ३१ जानेवारी २०२१ पूर्वी जोडणी करण्याचे नियोजन करावे. 
डॉ. राजेंद्र भारुड (जिल्हाधिकारी)  

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news grain on the ration card aadhar card link