नवस करत पाळले जाते ब्रह्मचार्य--पावणेआठशे वर्षांची परंपरा प्रथमच खंडित; नाचणाऱ्यांचा जथा गायब 

aadivashi holi
aadivashi holi

नंदुरबार : पांरपरिक नृत्य व संस्कृतीचे दर्शन घडवित लाखोंच्या साक्षीने गेल्या पावणेआठशे वर्षांची पंरपरा असलेली सातपुड्यातील काठीची राजवाडी होळी रविवारी (ता. २८) मध्यरात्री स्थानिक ग्रामस्थ व नवस फेडणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीत प्रथमच साध्या पद्धतीने साजरी झाली. कोरोनाने आदिवासींच्या या आनंद पर्वणीवरच गदा आणली आहे. 
सातपुड्यातील होळी उत्सव पंधरा दिवस चालतो. काठी संस्थानच्या राजवाडी होळीलाच मानाची होळी मानली जाते. सातपुड्यातील आदिवासी बांधव संपूर्ण कुटुंबासह पारंपरिक पेहराव करून काठी येथे दाखल होतात. होळी उभारण्यासाठीचा खड्डा खणला जात नाही, तर तो हाताने माती काढत तयार केला जातो. नवस केलेले भाविक नाचत होळीला येतात. खड्ड्यातील माती उकरतात. होळीचा बांबू गुजरातमधील डांगच्या जंगलातून आणला जातो. तो सर्वाधिक उंच ७० ते ८० फुटांचा असतो. नेमून दिलेले मानकरी जंगलात जाऊन बांबू आणतात. कोणत्याही हत्याराविना लाकडी काठ्यांच्या मदतीने मुळासकट काढून जमिनीवर पडू न देता अनवाणी पायाने उचलून आणतात. 

...अशी होते पूजाविधी 
होळीच्या दिवशी काठीत ते दाखल होतात. तेथे वडाच्या झाडाजवळ ठेवून त्याची संस्थानच्या यजमानांकडून पूजा केली जाते. या वेळी राजे उमेद सिंह यांच्या शस्रांचे आणि राजगादीचेही पूजन केले जाते. तिथून हा बांबू गावातील हनुमान मंदिर, राम मंदिर, पीरबाबा दर्गात विधिवत पूजा करून होळीच्या ठिकाणी आणला जातो. पुन्हा त्याची पूजा करून त्याला खोबरा वाटी, हार-कडे, खजूरची माळ बांधतात. त्यानंतर त्याला आंब्याची आणि जांभळाची पाने गुंडाळली जातात. त्यानंतर तो उभा केला जातो. लाकडे, शेणाच्या गवऱ्या लावले जातात. होळीभोवती वाद्य वाजवत नृत्य केले जाते. 

नवस व ब्रह्मचार्य 
होळीच्या पाच, सात, नऊ दिवस आधी अनेक जण ब्रह्मचर्य धारण करून नवस करतात. या काळात खाटेवर न झोपणे, अनवाणी राहणे, स्रियांना स्पर्श न करणे, मांसाहार टाळणे, व्यसन न करणे, होळीच्या दिवशी सोंग धारण करणे अशी परंपरा आहे. एकदा नवस केला, की तो सलग पाच वर्षे पाळला जातो. यातून एकप्रकारे होळीमातेला वंदन करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. सातपुड्यातील लाखो आदिवासी बांधव कुणाच्याही निमंत्रणाशिवाय याठिकाणी येतात. या वेळी नृत्य आणि ढोल वाजण्याच्या स्पर्धाही होतात. 

बाबा, बुध्यांचा पेहराव 
संपूर्ण अंगावर नक्षीकाम करतात. पायात घुंगरू, कमरेला घुंगरांचा पट्टा किंवा भोपळ्याचा कमरपट्टा, डोक्यावर मोरपिसाचे टोप किंवा पारंपरिक फेटे, स्रियांच्या गळ्यात चांदीच्या नाण्यांच्या माळा, पायात पैंजण, रंगीबेरंगी साड्या, कपडे असा पोशाख असतो. चेहऱ्यावर प्राणी, राक्षक, विदूषक यांचे विविध मुखवटे चढवलेले असतात. या वेळी हातात बिरी, टिपऱ्या, तुतड्या, तूर, मांदळ, बासरी, ढोल अशी पारंपरिक वाद्य आणि तलवार, कोयता, भाला, धनुष्यबाण ही शस्र असतात. यातील काही लोक बाबा बुध्या, घेर, मोरख्या, कहांडोखा, मोडवी, शिकारी असे वेगवेगळे रूप धारण करून तसा पोशाख करतात. पारंपरिक आदिवासी नृत्य करत बेफाम होऊन नाचतात. पहाटे लाखोंच्या साक्षीने होळी पेटवली जाते. तिच्याभोवती ताल धरत नृत्य केले जाते. होळी पेटवून सर्वजण घरी परततात. ज्यांनी नवस केलेला असतो ते पुढील होळीला हजेरी लावतात. 

संपादन - राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com