esakal | तळोद्यात ३० ऑक्सिजन बेडच्या हॉस्पिटलची उभारणी 

बोलून बातमी शोधा

mla rajesh padvi

बेडअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे तळोदा येथे ३० ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले हॉस्पिटल सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिल्या आहेत

तळोद्यात ३० ऑक्सिजन बेडच्या हॉस्पिटलची उभारणी 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तळोदा (नंदुरबार) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हातोडा रोडवरील तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयात ३० ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. तसा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून, या पशुवैद्यकीय चिकित्सालयाची आमदार राजेश पाडवी यांनी पाहणी केली. पाहणीत पशुवैद्यकीय चिकित्सालयात प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी बांधकाम विभागाला व संबंधित ठेकेदाराला दिल्या. 
या वेळी तहसीलदार गिरीश वखारे, नगराध्यक्ष अजय परदेशी, तालुका वैद्यकीय अधिकारी महेंद्र चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक विजय पाटील, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस. जी. सूर्यवंशी, टेक्निकल ऑफिसर राहुल गुरव, बांधकाम ठेकेदार आर. बी. पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी विश्वास नवले उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. बेड वेळेवर उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे बेडअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे तळोदा येथे ३० ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले हॉस्पिटल सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिल्या आहेत. तसा प्रस्ताव तहसीलदार गिरीश वखारे यांनी बांधकाम विभाग व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नंदुरबार यांना पाठविला. त्यात पशुसंवर्धन विभागाचीही पशुचिकित्सालयात रुग्णालय बनविण्यासाठी हरकत नसल्याची माहिती दिली आहे. 
यामुळे हातोडा रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक २६० च्या जागेवर तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय व निवासस्थानाचे बांधकाम ताब्यात घेऊन त्याचे हॉस्पिटलमध्ये रूपांतर होणार आहे. चिकित्सालयाचे व निवासस्थानाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. केवळ पाणीपुरवठा, वीजजोडणी, शौचालयाचे काम बाकी आहे. त्यामुळे बांधकाम ठेकेदाराला युद्धपातळीवर कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून, कामाची गती कशी राखली जाते त्यावर हॉस्पिटलची उभारणी अवलंबून राहणार आहे. 
 
देखरेख ठेवणे सोपे जाणार 
तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय उपजिल्हा रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. कोणत्याही स्थितीत तेथे तातडीने पोचता येणार आहे. एकाच रस्त्यावर दोन्ही ठिकाणे असल्याने देखरेख ठेवणे सोपे जाणार आहे. त्यात ऑक्सिजन बेडची सुविधा असलेल्या हॉस्पिटलची निर्मिती तातडीने झाल्यास रुग्णांना सोयीचे ठरणार आहे. 
 
कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता रुग्णांची वाढ वेगाने होत आहे. त्यात रुग्णांच्या सोयीसाठी पशुवैद्यकीय चिकित्सालय इमारतीचा वापर करून ३० ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी येत्या दहा दिवसांत येथील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. 
-राजेश पाडवी, आमदार