
नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी (ता. ८) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर पावसाचा जोर वाढला. दुपारी तीननंतर एक ते दीड तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पूर्ण रात्रभरही पावसाची रिपरिप सुरू राहिली.
नंदुरबार : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील गहू, हरभरा, केळी, पपई, टोमॅटो, भाजीपाला आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच शहरात व्यापाऱ्यांनी लाल मिरची वाळविण्यासाठी सुरू केलेल्या पथारीचेही नुकसान झाले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रांगणात व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेल्या धान्य मालाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी व मिरची व्यापाऱ्यांवर अस्मानी, सुलतानी संकट कोसळले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी (ता. ८) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर पावसाचा जोर वाढला. दुपारी तीननंतर एक ते दीड तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पूर्ण रात्रभरही पावसाची रिपरिप सुरू राहिली. यामुळे शेतकऱ्यांचा शेतातील गहूसह पिके भुईसपाट झाले. ज्या शेतकऱ्यांनी गव्हाची आगाऊ पेरणी केली होती त्यांचा हाता-तोंडाजवळ आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. खरिपानंतर आता रब्बीवर मजल असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा केवळ संकटच आले आहे. शेतकरी अवकाळी पावसाच्या पिकांचा नुकसानीमुळे हताश झाले आहेत. त्यांचा तोंडून शब्दही निघेना, अशी अवस्था झाली आहे.
पंचनामे करण्याची मागणी
जिल्ह्यातील शेतकरी व मिरची व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आले आहे. त्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी व त्यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून तत्काळ कृषी व महसूल विभागाला आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसे निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदन देताना उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे, तालुकाप्रमुख वेंकट पाटील, सागर साळुंखे, जगदीश पाटील, ब्रिजलाल पाटील, कमलेश पाटील, प्रफुल्ल खैरनार आदी उपस्थित होते.
आदेशाची वाट पाहू नका : रघुवंशी
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना दूरध्वनी करून सर्वप्रथम नुकसानीचे पंचनामे करा, आदेशाची वाट पाहू नये, पंचनामे झालेले असतील, माहिती तयार असेल, तर शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळण्यास मदत होईल, असे सांगितले.
संपादन ः राजेश सोनवणे