वयाची साठी उलटलेली तरीही पाच वेळेस पायी परिक्रमा; आता लोटांगण घालत नर्मदा परिक्रमा

narmda parikrama
narmda parikrama

तळोदा (नंदुरबार) : दुर्दम्य इच्छाशक्ती व मानसिक कणखरपणा असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करणे सोपे जाते. याच इच्छाशक्तीच्या जोरावर मध्यप्रदेशातील रायसेन जिल्‍ह्‍यातील बेनिसिंग भगतजी चक्क लोटांगण घालत नर्मदा परिक्रमा करीत आहेत. लोटांगण घालत परिक्रमा करतांना या प्रवासातच मित्र बनलेले साथी त्यांना मदत करत आहेत. दररोज दोन तीन किलोमीटर अंतर पार करून ही यात्रा नऊ वर्षात पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र ही तपश्चर्या लोटांगण घालत पूर्ण करणारच असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
नर्मदा परिक्रमा करून नदी किनाऱ्यावरील तीर्थक्षेत्रांना भेट दिल्याने मानवाला पुण्य मिळते; अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे. त्यामुळे दरवर्षी चातुर्मास संपल्यानंतर प्रबोधिनी एकादशीपासून नर्मदा परिक्रमा करण्यासाठी हजारो भाविक जात असतात. ही यात्रा पायी केल्यास तीन वर्ष तीन महिने आणि 13 दिवसात पूर्ण होते असा समज आहे. त्यासाठी एकूण 2600 किलोमीटर अंतर पायी चालावे लागते. मात्र आपल्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून घेण्यासाठी अनेक जण ही यात्रा पूर्ण करण्यासाठी वेगळा मार्ग निवडतात.

पाच वेळेस पायी यात्रा
मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील रहिवासी असलेले बेनिसिंग भगतजी यांनी आधी पाच यात्रा पायी केल्या असून ही सहावी यात्रा लोटांगण घालत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यात्रा 1 जानेवारी 2020 पासून सुरू केली. तळोदा शहराजवळ बायपास वरून जात असताना त्यांची भेट झाली. या भेटीत त्यांनी यात्रेचे अनुभव कथन केले. 

मित्रांचीही साथ
यात्रेत खेडी (जि. खरगोन) येथील रहिवासी बाबूलाल पाटीदार व उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील छेदीराज गुप्ता यांचे सहकार्य मिळत आहे. चातुर्मासात या मित्रांची भेट झाली व त्यांच्याकडे लोटांगण घालत नर्मदा परिक्रमा करण्याचा मानस व्यक्त केल्याने त्यांनी देखील मदत करण्याचे सांगितले. बेनीसिंग हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांचे वय आता एकशष्टीकडे झुकले आहे; तर बाबुलाल पाटीदार हे देखील शेतकरी असून 71 वर्ष वयाचे आहेत. बाबूलाल पाटीदार यांची ही 12 वी यात्रा असल्याचे त्यांनी सांगितले.

रोज केवळ दोन– तीन किमीचा प्रवास
दरम्यान या यात्रेत दररोज सकाळी लोटांगण घालत प्रवास सुरु करून दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले. साधारणतः साडेतीन वर्षात परिक्रमा पूर्ण केली जाते. मात्र लोटांगण घालत प्रवास करत असल्याने यात्रेला जास्त वर्षे लागू शकतात. त्यामुळे नऊ वर्षात हे यात्रा पूर्ण होईल; असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र आपल्या आत्मविश्वासाने यात्रेला त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात आपले स्वप्न साकार करावयाचे असेल तर मानसिक कणखरतेतूनच करता येईल असे त्यांनी शेवटी सांगितले. लोटांगण घालत यात्रा करत असल्याने अनेकांनी त्यांचे मोबाईलद्वारे फोटो काढले व विचारपूस केली. त्यामुळे वाटेत भेटलेल्या माणसांशी बोलून बरे वाटत असल्याचे ते सांगतात.त्यात अनेकजण मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com