आंतरराष्ट्रीय पदक हेच पुढचे लक्ष्य; सातपुड्यातील हरीण रिंकी पावराचा विश्वास

rinki pawara
rinki pawara

तळोदा (नंदुरबार) : आतापर्यंतची वाटचाल उत्साह वाढविणारी असली तरी, मी त्याबाबत पूर्ण समाधानी नाही. राष्ट्रीय स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहे. पण आता मला आंतरराष्ट्रीय पदकाचे लक्ष्य गाठायचे आहे. त्यासाठी रोज सहा ते तास सराव करत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पदक हेच एकमेव उद्दिष्ट आहे. सातपुड्याच्या खर्डी (ता. धडगाव) या दुर्गम भागातून पुढे येताना सुरवातीला बूट नसताना अथक परिश्रमाच्या बळावर मार्गातील अडथळ्यांवर मात करीत तीन हजार मीटरचा सुवर्णपदकाचा टप्पा गाठणारी धावपटू रिंकी पावरा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘सकाळ’शी बोलत होती. 

प्रश्न : तुला रनर बनावस का व केव्हा वाटले? 
रिंकी
: मी सातवीत असताना सुरवानी येथे धावण्याची स्पर्धा होती. त्यात मी सहभागी झाले. त्या स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक आला. त्या वेळी मला स्वतःमधील टॅलेंट, माझी कुवत लक्षात आली. तेव्हापासून माझ्यात धावण्याची जास्त आवड निर्माण झाली व मी ठरविले, की मला चांगले रनर व्हायचं आहे. 

प्रश्न : पुढील लक्ष्य काय आहे? 
रिंकी
: मला आता इंटरनॅशनल लेव्हलच्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करायचे आहे तसेच ऑलिंपिकमध्ये सहभागी होत त्यातही पदक मिळवायचे आहे. त्यादृष्टीने मी सराव करीत आहे. 

प्रश्न : पुढील लक्ष्य प्राप्तीसाठी काही विशेष सराव करीत आहेस का? 
रिंकी
: हो, आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी होण्यासाठी मी अधिक कष्ट घेत आहे. आठवडाभराचे सरावाचे शेड्यूल आखत माझे प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली योजनाबद्ध पद्धतीने रोज सकाळ-सायंकाळ नाशिक येथील मीनाताई ठाकरे क्रीडांगणावर पाच ते सहा तास सराव करते. 

प्रश्न : आजपर्यंत जे यश मिळवले, त्यावर समाधानी आहेस का? 
रिंकी
: नाही. भविष्यात मला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि मी आत्ताच माझ्या कामगिरीवर समाधानी झाले, तर कदाचित मला मोठी मजल मारता येणार नाही. 

प्रश्न : उत्तुंग यश प्राप्तीसाठी या भागातील मुलींना संधी काय आहे? 
रिंकी
: आपल्या भागातील विशेषतः आदिवासी मुलींमध्ये नैसर्गिक गुणवत्ता असते, मुली फार जिद्दी व काटक असतात. त्यामुळे त्यांनी जर योग्य वयात व योग्य मार्गदर्शनाखाली आपली वाटचाल सुरू केली, तर या भागातील मुलीदेखील विविध क्रीडा प्रकारांत चांगले यश प्राप्त करू शकतात. 

प्रश्न : यशात कोणाचा वाटा आहे? 
रिंकी
: माझ्या यशात वडील धन्या पावरा, आई धावरीबाई पावरा, माझे सर्व भाऊ-बहीण, इंजिनिअर झेलसिंग पावरा, हारसिंग पावरा, पी. आय. मधुकर नानडीकर, प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांचा खूप मोठा वाटा आहे. 

आजपर्यंत मिळवले यश
नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षांखालील गटात ३००० मीटर धावण्याचा शर्यतीत प्रथम क्रमांक. 
गुवाहाटी (आसाम) येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धत ३००० मीटर धावण्याचा शर्यतीत कांस्यपदक. 
पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com