सहा वर्षीय मुलीला दुचाकीने दिली धडक अन्‌ तिलाच उचलून झाले पसार 

फुंदीलाल माळी
Wednesday, 20 January 2021

बोरद रस्त्यावरील गुंजाळी ते कढेल फाटा दरम्यान धडगाव तालुक्यातील घाटली काकडदा परिसरातील ऊस तोडणी करणारे तोडणीसाठी शेतात थांबले आहेत. त्या कुटुंबातील मुली व काही महिला मंगळवारी दुपारी अडीच– तीनच्‍या सुमारास शेजारील शेतातून पाणी भरत होते.

तळोदा (नंदुरबार) : तळोदा- बोरद रस्त्यावरील गुंजाळी ते कढेल दरम्यान ऊस तोडणी कामगाराची मुलगी पाणी भरण्यासाठी जात असताना तिला दुचाकीने धडक दिली. दुचाकीस्वारांनी धडक दिलेल्या मुलीलाच दुचाकीवर बसवून पोबारा केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी तीनला ही घटना घडली. मुलगी अजूनही आईवडिलांकडे परत आलेली नाही. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून दुचाकीस्वार व धडक दिलेल्या मुलीचा शोध घेण्यात येत आहे. 

बोरद रस्त्यावरील गुंजाळी ते कढेल फाटा दरम्यान धडगाव तालुक्यातील घाटली काकडदा परिसरातील ऊस तोडणी करणारे तोडणीसाठी शेतात थांबले आहेत. त्या कुटुंबातील मुली व काही महिला मंगळवारी दुपारी अडीच– तीनच्‍या सुमारास शेजारील शेतातून पाणी भरत होते. त्याच वेळेला तळोद्याकडून भरधाव येणाऱ्या दुचाकीने दहा वर्षीय मुलीला धडक दिली. धडक बसल्याने ती मुलगी खाली पडली व जखमी झाली. त्याचवेळी दुचाकीस्वारांनी विचारपूस न करता मुलीला दुचाकीवर बसवून घेऊन गेले. 

दवाखान्‍यात केला तपास तर
कुटुंबीयांना व उपस्थित असलेल्या कामगारांना वाटले की दुचाकीस्वार दवाखान्यात घेऊन जात आहेत. त्यामुळे त्यांनी मोड, बोरदपर्यंत दवाखान्यांमध्ये चौकशी केली असता दुचाकीस्वार व मुलगी देखील मिळून आले नाहीत. 

मुलीला नेमके नेले कोठे?
मुलीला घेऊन दुचाकीस्वार नेमके गेले कुठे हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. बुधवारी सायंकाळपावेतो त्या मुलीचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे आता या घटनेतील दुचाकीस्वार कोण? त्या मुलीला त्यांनी नेमके कुठे नेले? कशासाठी नेले? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.  

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news taloda six year girl kidnaping bike

Tags
टॉपिकस
Topic Tags: