
कोविड १९ च्या अनुषंगाने सर्वेक्षण, शोध, प्रतिबंध, चाचणी, उपचार मदत कार्याशी संबंधित कर्तव्यावर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पन्नास लाख रुपयांचे विमाकवच देण्याबाबत वित्त विभागाने २९ मे २०२०ला शासन निर्णय केला.
शनिमांडळ (नंदुरबार) : कोरोना महामारीच्या काळात आपले कर्तव्य बजावत कोविड १९ चे सर्वेक्षण, जनजागृती, मदतकार्यात कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या निर्णयानुसार पन्नास लाख रुपयांचे सर्वंकष वैयक्तिक अपघात विमाकवच मिळणार आहे. त्यामुळे कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
कोविड १९ च्या अनुषंगाने सर्वेक्षण, शोध, प्रतिबंध, चाचणी, उपचार मदत कार्याशी संबंधित कर्तव्यावर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पन्नास लाख रुपयांचे विमाकवच देण्याबाबत वित्त विभागाने २९ मे २०२०ला शासन निर्णय केला. राज्यात कोरोना कर्तव्य बजावणाऱ्यांची संख्या पाच लाखांवर आहे. या निर्णयामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विमाकवच मिळावे, अशी मागणी राज्यातील विविध संघटनांनी केली होती. त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने कोरोना कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विमाकवच लागू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. ही गोष्ट स्वागतार्ह आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने याप्रमाणे कार्यवाही करून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा.
-शिवाजी खांडेकर, राज्य सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळ