आरम नदीपात्रात अडकलेल्या युवकाला वाचविण्यात प्रशासनाला यश

रोशन खैरनार
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

सटाणा : बागलाण तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणे ओसंडून वाहत आहेत तर नद्यानाल्यांना पूर आला आहे. तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यातील केळझर धरण १०० टक्के भरल्याने आरम नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सोडण्यात आला असून आरम नदीला पुर आला आहे.

खमताणे (ता.बागलाण) येथील आरम नदीपात्रातील बंधार्‍यावर पाण्याच्या मोठ्या प्रवाहात आज सोमवार (ता.५) रोजी दुपारपासून एक आदिवासी युवक अडकला होता. तब्बल सात तासांच्या बचाव कार्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता त्याला काढण्यात प्रशासनाला अखेर यश आले.

जून व जुलै महिना कोरडा गेल्याने बागलाण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून तालुक्यात सुरू झालेल्या संततधार पावसामुळे केळझर, हरणबारी ही मध्यम तर हत्ती नदीवरील पठावे तर कान्हेरी नदीवरील दसाणे ही लघु प्रकल्प १०० टक्के भरून वाहत आहेत. या पावसामुळे सुमारे ५७२ दशलक्ष घनफूट क्षमता असलेले केळझर धरण आज सोमवारी (ता.५) रोजी सकाळी ओव्हर फ्लो झाले आहे. सांडव्यातून होत असलेल्या जवळपास साडेसहा हजार क्युसेक पाण्याच्या विसर्गामुळे आरम नदीला पूर आला आहे.

आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास खमताणे येथील मच्छिंद्र म्हाळू गायकवाड (वय २०) हा आदिवासी युवक शेती कामावरून घराकडे परतत होता. आरम नदीवरील बंधारा पार करत असतांना अचानक पुराचे पाणी वाढल्याने तो बंधाऱ्याच्या गेटवर अडकून पडला. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने त्याला तेथून बाहेर पडणे अशक्य झाले.

युवक अडकून पडल्याची वार्ता व त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने प्रशासनाने तात्काळ सूत्र हलविली. बागलाणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, नगराध्यक्ष सुनील मोरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, सामाजिक कार्यकर्ते शामकांत बगडाणे, सटाणा पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तीन वाजता बचाव कार्य सुरु करण्यात आले. प्रशासनाच्या तब्बल सात तासांच्या अथक परिश्रमानंतर युवकाला वाचविण्यात यश आले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती.

- हरणबारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधारेमुळे मोसम नदीला पूर आला आहे. पूरस्थितीमुळे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नामपूर येथील आठवडे बाजार देखील हलविण्याचे आदेश प्रशासनाने दिले.

- अंतापूर नजीक हरणबारी उजव्या कालव्यात पावसाचे पाणी गेल्याने कालव्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे करंजाडी खोऱ्यातील पिंगळवाडे, करंजाड, भूयाने, निताणे, पारनेर, बिजोटे, आखतवाडे, आनंदपूर या भागातील शेती सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी देखील याच ठिकाणी भगदाड पडले होते. संबंधित विभागाने कालव्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.

- ब्राम्हणपाडे येथे राजेंद्र वसंतराव बोरसे यांच्या घराची भिंत कोसळून पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news aarom youth