वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन, अभाविपच्या आंदोलनानंतर निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

नाशिक ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत वाणिज्य शाखेच्या विषयाच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेण्यात आला. अभाविपतर्फे या संदर्भात मंगळवारी (ता. 18) विद्यापीठाच्या विभागीय उपकेंद्रात आंदोलन केले होते. 

नाशिक ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत वाणिज्य शाखेच्या विषयाच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेण्यात आला. अभाविपतर्फे या संदर्भात मंगळवारी (ता. 18) विद्यापीठाच्या विभागीय उपकेंद्रात आंदोलन केले होते. 

तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा निकालात बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयात 52 टक्के विद्यार्थी नापास झाले. या विषयाच्या सर्व उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन केले जावे व निकाल पुन्हा लावला जावा, अशी मागणी विद्यार्थी परिषदेने आंदोलनाद्वारे केली. या विषयाच्या सर्व उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकित करून 30 जूनपर्यंत पुन्हा एकदा निकाल देण्यात येईल, असा निर्णय विद्यापीठाने घेतला.

पीएच.डी.साठी विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या पीईटी या परीक्षेला अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना बसण्याची तरतूद करावी, अशीही मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली होती. या मागणीवरही 30 जूनपर्यंत निर्णय घेऊन अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला पात्र ठरविण्यात येईल व पूर्वपरीक्षेच्या अर्जाची मुदत वाढवून देण्यात येईल, असे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले. नाशिकमधील विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विजय सोनवणे यांनी विद्यापीठ व विद्यार्थ्यांमधील हा तिढा सोडविण्यासाठी विशेष पाठपुरावा केला. 

विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान बघता मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत बी.कॉम. व पीएच.डी. पूर्वपरीक्षेचा विषय मांडला आहे. त्यावर सकारात्मक निर्णयही झाले आहेत. यापुढे पुनर्मूल्यांकनाची कार्यवाही लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. 
- विजय सोनवणे, सदस्य, व्यवस्थापन परिषद  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ABVP ANDOLAN