मद्यधुंद कारचालकाची दुचाकीला धडक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

जळगाव - चांदसर (ता. धरणगाव) येथून लग्न सोहळा आटोपून भादली येथे स्वत:साठी मुलगी बघण्यासाठी जाताना तरुणाच्या मोटारसायकलीस मद्यधुंद कारचालकाने समोरून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. आसोदा रेल्वेगेटपासूनच सुसाट कार पळविणाऱ्या या तरुणांनी सुरवातीला कामावरून परतणाऱ्या गावकऱ्यांच्या दुचाकीला धक्का दिला. नंतर मात्र हॉटेल गौरवजवळ एका मोटारसायकलीस समोरून जोरदार धडक दिल्याने मायलेकासह तिघे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी तत्काळ जखमींना जिल्हा रुग्णालयात त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. 

तांदळी (ता. अमळनेर) येथील सतीश भीमराव कोळी व त्यांची आई तुळसाबाई भीमराव कोळी हे आज सकाळी चांदसर येथे नातेवाइकांच्या लग्नासाठी आले होते. लग्न सोहळा आटोपून सतीश कोळी यांचा मावस भाऊ भूषण सुनील शिंदे (कोळी) व सतीशची आई असे तिघे सतीशच्या लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी भादली जाण्यासाठी निघाले होते. सतीश, त्याची आई तुळसाबाई व भूषण हे तिघेही भूषणच्या विनाक्रमांकाची शाईन मोटारसायकल घेऊन भादलीकडे जात होते. काही अंतरावरच भादली गाव असताना समोरून सुसाट आणि वेड्यावाकड्या पद्धतीने येणाऱ्या कारने (एमएच,19. सीके501) त्यांच्या मोटारसायकलीस जोरदार धडक दिली. अपघातात तिघेही दूरवर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी अपघाताच्या दिशेने धाव घेत जखमींना उचलले तर, अपघाताला कारणीभूत चालकाला पाठलाग करून थांबवले. 

तिघेही गंभीर जखमी 
अपघातात तुळसाबाई व सतीश यांच्या पायाला व हाताला दुखापत झाली आहे. तर भूषण याला जबर दुखापत झाली असून, त्याच्या मांडीचे हाड तुटल्याने रक्तस्राव झाला होता. तिघांना तत्काळ रिक्षाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तिघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

कारचालकासह चौघे मद्यपी 
मोटारसायकलस्वारांना धडक देणाऱ्या कारचालकासह कारमधील चौघे तरुण दारूच्या नशेत तर्रर्र असल्याचे अपघातग्रस्तांना मदत करणारे आणि पाठलाग करून कार थांबविणाऱ्या ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, ही कार शहरातील अंजिठा चौफुलीवर हॉटेल मालकाची असल्याचे समजते. दरम्यान, या कारचालकाने भादली येथून जळगावकडे येत असताना भादली येथील शाळेमधील शिक्षिका पूनम बोंडे, एस. पी. ठाकूर, डी. के. धनगर, पी. बी. गायकवाड यांच्या मोटारसायकलींना धक्का मारला होता. अपघातानंतर नागरिकांनी त्यांना पकडल्यावर चोप दिला. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद नव्हती. 

Web Title: marathi news accident jalgaon

टॅग्स