अभिनेता धर्मेंद्र यांनी पालटले टोकडेचे रुप... 

आनंद बोरा
सोमवार, 26 मार्च 2018

नाशिक : अभिनेता धर्मेंद्र यांच्या सहभागामुळे टोकडे (ता. मालेगाव) गावाचे रुप पालटले आहे. त्यांनी आई सरस्वती कौर यांच्या नावाने शाळा सुरु करण्यास सहकार्य केले. आता याच गावात शहीद भगतसिंग यांचे स्मारक उभे राहत आहे. 

नाशिक : अभिनेता धर्मेंद्र यांच्या सहभागामुळे टोकडे (ता. मालेगाव) गावाचे रुप पालटले आहे. त्यांनी आई सरस्वती कौर यांच्या नावाने शाळा सुरु करण्यास सहकार्य केले. आता याच गावात शहीद भगतसिंग यांचे स्मारक उभे राहत आहे. 

टोकडे या साडेपाच हजार वस्तीच्या गावात जाट, मागासवर्गिय आणि आदिवासी बांधवांची वस्ती असून जाट बांधवांची लोकसंख्या सत्तर टक्‍क्‍यांपर्यंत आहे. राजस्थानमधील बांधवांशी इथल्या कुटुंबियांच्या पूर्वजांच्या इतिहास सांधला गेलाय. या गावात धर्मेंद्र यांनी आईच्या नावाने शाळा सुरु करण्यासाठी 51 हजार रुपयांची देणगी दिली. ही देणगी ते 91 हजारांपर्यंत घेवून गेलेत. धर्मेंद हे गावच्या प्रेमात पडल्याने ते गावातील रामनवमीच्या यात्रेला येत असत. ते गावात तीन दिवस मुक्काम करत असत. गावातील मुलांनी शिकावे हा त्यांचा शाळेच्या उभारणीमागील उद्देश होता. तत्कालिन शिक्षणमंत्री बळीराम हिरे यांनी दुष्काळी भागासाठी म्हणून टोकडे आणि सांगली जिल्ह्यातील एका गावासाठी शाळा मंजूर केली. 

गावात शाळेसाठी परवानगी मिळाली पण आर्थिक मदतीशिवाय इमारत उभी करणे अवघड होते. त्यावेळी हिंद केसरी दारासिंग यांनी ही शाळा सुरु करण्यासाठी खूप मदत केली. त्यांनी शांताराम लाठर यांची भेट धर्मेंद्र यांच्याशी करून दिली. धर्मेंद्र यांनी त्यांचा शाळेचा प्रस्ताव ऐकताच, आईच्या नावाने शाळा सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला. 1992 मध्ये शाळेचे बांधकाम पूर्ण झाले आणि रामनवमीला शाळेच्या उद्‌घाटनाचा मुहूर्त ठरला. त्यावेळी धर्मेंद्र, अभिनेत्री हेमामालिनी, दारासिंग आणि त्यांचा परिवार उद्‌घाटन सोहळ्यास उपस्थित राहिला. तेंव्हा धर्मेंद्र यांची बैलगाडीतून ग्रामस्थांनी मिरवणूक काढली.

   तत्कालिन आमदार पुष्पाताई हिरे, बलदेव घोसा हेही उपस्थित होते. शाळेच्या पटांगणात आता शहीद भगतसिंग यांच्या स्मारकाची पायाभरणी रामनवमीला झाली आहे. स्मारकासाठी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी दहा लाख रुपये मंजूर केले आहेत, असे श्री. लाठर यांनी सांगितले. ते म्हणाले, की गावात उदासीन बडा आखाडा आहे. तसेच राज्यात 22 गावांमध्ये जाट समाज वास्तव्यास आहे. मालेगाव तालुक्‍यातील जळकु, राजमाने, हाताने, लखाने, पळादरे, शेरूळ, पादळदे, सतारपाडे, नरडाने, चिंचगव्हाण, धापूर आदी गावात जाटवस्ती आहे. दुग्धोत्पादन आणि शेती हा बऱ्याच कुटुंबाचा व्यवसाय आहे. रामलीला, भोवाडा उत्सव बांधव साजरा करतात. 

महराष्ट्र जाट समाजाचे अध्यक्ष राम लाठर म्हणाले,
""जाट समाजात शिक्षणाचे प्रमाण खूप अल्प होते. अशा काळात अभिनेता धर्मेंद्र आणि त्यांच्या परिवाराने आमच्या दुर्लक्षित, दुष्काळी गावात शाळा सुरु करण्यासाठी मोठी आर्थिक मदत दिली. आता आम्ही शहीद भगतसिंग यांचे स्मारक उभारत असून जूनमध्ये ते पूर्ण होईल.'' 

Web Title: marathi news acter dharmendra

फोटो गॅलरी