कबड्डीपटूंचे गाव- आडगाव, राज्यात बटाटेही प्रसिद्ध

आनंद बोरा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नाशिक ः महापालिकेतील 22 खेड्यांमधील एक आडगाव. अठरा हजारांपर्यंत लोकवस्ती असलेले आडगाव कबड्डीपटूंचे गाव म्हणूनही ओळखले जाते. आडगावच्या शेतात पिकलेले बटाटे राज्यभर प्रसिद्ध होते. नाशिकचे माजी महापौर प्रकाश मतेंची ही जन्मभूमी असून, शेतकरी चळवळीचे केंद्र म्हणूनही गावाने ओळख अधोरेखित केली आहे. शेतमालाच्या मार्केटिंगमध्ये सह्याद्री फॉर्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आयाम देणारे विलास शिंदे यांचेही हे गाव. 

नाशिक ः महापालिकेतील 22 खेड्यांमधील एक आडगाव. अठरा हजारांपर्यंत लोकवस्ती असलेले आडगाव कबड्डीपटूंचे गाव म्हणूनही ओळखले जाते. आडगावच्या शेतात पिकलेले बटाटे राज्यभर प्रसिद्ध होते. नाशिकचे माजी महापौर प्रकाश मतेंची ही जन्मभूमी असून, शेतकरी चळवळीचे केंद्र म्हणूनही गावाने ओळख अधोरेखित केली आहे. शेतमालाच्या मार्केटिंगमध्ये सह्याद्री फॉर्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आयाम देणारे विलास शिंदे यांचेही हे गाव. 

गावात मारुती, दत्त, शंकर, महालक्ष्मी, गणपती, खंडेराव, दगडोबा महाराज आदी मंदिरे आहेत. गावात दगडोबा महाराज मंदिर आणि दत्त जयंतीला यात्रोत्सव होतो. महापालिकेची आणि रयत शिक्षण संस्थेची शाळा गावाचे वैभव आहे. पन्नास वर्षांपासून येथे भजनी मंडळ असून, मनसुखराव देशमुख, बाळासाहेब राऊत, रतन राऊत, शिवाजी शिंदे, आनंदा दिवटे, श्रीकांत रहाळकर, विठ्ठल देशमुख आदी ज्येष्ठांसह तरुण मंडळी भजन म्हणतात. (कै.) तुकाराम मते, (कै.) किसान नवले, गंगाधर हळदे, साहेबराव देशमुख, अशोक शिंदे, भिकाजी शिंदे, बापू शिंदे या पहिलवानांनी आपापल्या काळात राज्यभरातील कुस्त्यांचे फड जिंकले. 
कबड्डी खेळपट्टूंनी राष्ट्रीयस्तरावर नाव मिळवले. भाऊसाहेब लभडे, चंद्रकांत माळोदे, सुरेश माळोदे, गोविंद राऊत, सनी मते आदी काही खेळाडूंची आहेत. गावात तीनशेहून अधिक कबड्डीपटू आहेत. 
नेत्रावती नदी गावच्या बाजूने वाहते. पूर्वी गावात खूप आड होते. म्हणून गावाचे नाव आडगाव झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आडगावचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील बटाटे मुंबईकरांना खूप आवडायचे. सिमला येथून रेल्वे वॅगनने त्याचे बियाणे आणले जायचे. उत्पादित माल पूर्ण राज्यात विकण्यासाठी जात होता. पोलिस अधीक्षक आनंद जाधव, पोलिस निरीक्षक रंगनाथ ढारवळे या गावचे. दीडशे तरुण सैन्यदलात, तर पन्नासहून अधिक तरुण पोलिस दलात आहेत. तसेच प्रयत्नवादी तरुणांमुळे फुलांचे शहर म्हणूनही आडगावची ओळख होऊ पाहत आहे. गावाने श्रमदानातून तलाव बांधला. श्रावणात येथे हरिनाम सप्ताह होतो. पोळा हर्षोल्हासात साजरा होतो. गावात मशिद आहे. माजी खासदार गो. ह. देशपांडे यांच्या हस्ते उद्‌घाटन झालेली वेस गावात दिमाखात उभी आहे. लग्न सोहळ्यातील खर्चिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. 

मी उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरी न करता फुलशेती करण्याचे ठरविले. गावाजवळ एक एकरामध्ये पॉलिहाउसमधील गुलाबाचा प्रयोग यशस्वी केला. आता इतर शेतकऱ्यांना या शेतीबद्दल माहिती देत असतो. 
- उत्तम ढारबाळे (फूल उत्पादक) 
 

आमच्या गावात अनेक खेळाडू आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण मिळणे आवश्‍यक आहे. कबड्डी आपला देशी खेळ आमच्या गावातून मोठ्या उत्साहात खेळला जातो. बटाटेची जागा आता द्राक्षशेतीने घेतली आहे. 
-नानासाहेब देशमुख (शेतकरी) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news adgaon