अकलापूर शिवारात बिबट्या आढळला मृतावस्थेत

हरिभाऊ दिघे
रविवार, 21 जानेवारी 2018

रहिवाशाच्या मदतीने मृत बिबट्याला खासगी वाहनातून संगमनेर खुर्द येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत हलविले. त्याठिकाणी शवविच्छेदन केल्यानंतर मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बिबट्याचा अंगावर  कोणत्याही प्रकारच्या जखमा नव्हत्या. त्यामुळे त्याचा मृत्यू कशामुळे झाला आहे, याचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर कळेल. 

वनपरिक्षेत्र अधिकारी बी. एस. काळे

तळेगाव दिघे ( जि. नगर ) : संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारातील देवकर मळा येथे डाळींब बागेत अंदाजे दोन वर्षे वयाचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण समजू शकले नाही.

अकलापूर ( ता. संगमनेर ) शिवारात देवकर मळा याठिकाणी बाळशीराम देवकर शेतकरी आपल्या कुटुंबीयासमवेत राहतात. नेहमीप्रमाणे रविवारी ते शेतातील डाळींबबागेत गेले असता, त्यांना समोर झोपलेल्या स्थितीत बिबट्या दिसला. त्यामुळे  ते घाबरून गेले. मात्र बिबट्याची हालचाल होत नसल्याने त्यांच्या लक्षात आहे. हा प्रकार त्यांनी काही ग्रामस्थांच्या कानावर घातला. घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी बी. एस. काळे, वनरक्षक रोहिदास भोईटे,  एस. डी. थोरात, बाळू वैराळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

रहिवाशाच्या मदतीने मृत बिबट्याला खासगी वाहनातून संगमनेर खुर्द येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत हलविले. त्याठिकाणी शवविच्छेदन केल्यानंतर मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बिबट्याचा अंगावर  कोणत्याही प्रकारच्या जखमा नव्हत्या. त्यामुळे त्याचा मृत्यू कशामुळे झाला आहे, याचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर कळेल, असे घारगाव वनपरिक्षेत्र अधिकारी बी. एस. काळे यांनी सांगितले.

Web Title: Marathi news ahmednagar news aklapur leopard dead