बोहरींच्या हत्येची उकल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

जळगाव ः अमळनेरच्या बोहरी पेट्रोलपंपाचे संचालक अली असगर ऊर्फ बाबा बोहरी यांच्या हत्येचा छडा लावण्यात सतरा दिवसांच्या तपासानंतर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, बोहरींकडून दिला जाणारा "प्रोटेक्‍शन मनी' बंद झाल्याने कैलास नवघरेसह चौघांनी कट रचून त्यांची हत्या केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या सर्व संशयितांविरुद्ध "मोक्का' कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे संकेतही श्री. कराळे यांनी दिले. 

जळगाव ः अमळनेरच्या बोहरी पेट्रोलपंपाचे संचालक अली असगर ऊर्फ बाबा बोहरी यांच्या हत्येचा छडा लावण्यात सतरा दिवसांच्या तपासानंतर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, बोहरींकडून दिला जाणारा "प्रोटेक्‍शन मनी' बंद झाल्याने कैलास नवघरेसह चौघांनी कट रचून त्यांची हत्या केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या सर्व संशयितांविरुद्ध "मोक्का' कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे संकेतही श्री. कराळे यांनी दिले. 

अमळनेरच्या बोहरी पेट्रोलपंपाचे संचालक अली असगर (बाबा) हकिमोद्दीन बोहरी हे गेल्या 3 मेस पंपावरील डिझेल, पेट्रोल स्टॉक आणि दिवसभरात विक्री झालेल्या इंधनाची रक्‍कम घेत दुचाकीने मध्यरात्री घराकडे निघाले होते. शिवाजी उद्यानाच्या गल्लीत कैलास नवघरे याने त्यांच्या छातीवर जवळून गोळी झाडून पळ काढला होता. या खुनाच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा व चाळीसगाव पोलिस तपास करीत होते. 

असा लावला छडा 
निरीक्षक सुनील कुराडे यांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून राजेंद्र होळकर, शशी पाटील, अनिल इंगळे, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, संतोष मायकल, सुरेश पाटील, रवींद्र पाटील यांच्या पथकाने सापळा रचून बोहरी हत्या प्रकरणात मुस्तफा शेख मोहम्मद (वय 24, गांधलीपुरा, अमळनेर), तन्वीर शेख मुख्तार (वय 23, रा. पारधीवाडा) या दोघांना ताब्यात घेतले. दोघांनी खुनाची कबुली दिल्यावर त्यांचा साथीदार तौफीक शेख भुऱ्या (वय 24) यालाही पोलिसांनी अटक केली. या तिघांसोबत गुन्हे शाखेचे पथक ओझर (नाशिक) येथे पोचले. सूत्रधार कैलास नवघरे याचा संपूर्ण रात्र ओझर शहरात शोध घेतला. मात्र, तो निसटून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिस पथक त्याच्या मागावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

हल्ल्याची पूर्वतयारी 
घटनेआधी कैलास नवघरे, तौसिफ शेख, मुस्तफा शेख मोहम्मद, तन्वीर शेख मुख्तार या चौघांनी शिवाजी उद्यानाच्या कोपऱ्यावर सहा बिअर रिचवल्या. पंप बंद होताना मुख्य केबिनचे शटर खाली पडल्याचा आवाज ऐकून मारेकऱ्यांना संकेत मिळाले. तन्वीरने गल्लीतील पथदिवे बंद केले. मुस्तफा गल्लीच्या टोकावर उभा राहिला, तर नवघरे व तौफिक याने बोहरी यांच्या दुचाकीपुढे मोटारसायकल आडवी लावून त्यांना थांबवले. तौफिकने हातात तिखटाची पूड घेत बोहरींच्या दिशेने फेकली. मात्र, ओली असल्याने ती त्यांच्या डोळ्यात गेली नाही. अखेर नवघरेने जवळील रिव्हॉल्वर काढून गोळी झाडली. 

पोलिसांच्या हालचालींवर पाळत 
गोळी लागल्यावर बोहरी जिवंत आहे, की मृत झाले याच्यासह पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मुस्तफा आणि तन्वीर दोघेही दवाखान्यात पोचले. डॉ. बहुगुणे यांच्या रुग्णालयानंतर बाबा बोहरी यांना पहाटे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, तेव्हा नवघरेने रुग्णालयाच्या गच्चीवर बस्तान मांडले होते. तो रात्रभर रुग्णालयाच्या गच्चीवरच थांबून होता. मृत्यूची खात्री झाल्यावर त्याने अमळनेर सोडून कारने नाशिक जिल्ह्यातील ओझर गाठले. उर्वरित दोघे संशयित अमळनेरातच राहून पोलिसांच्या हालचाली फोनवरून कैलासला कळवत होते. 
 

Web Title: marathi news amalner bohri murder