अमळनेरला बोरी नदीत दोन युवकांना जलसमाधी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

अमळनेर ः हिंगोणे (ता. अमळनेर) शिवारातील बोरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. दानिश शेख अरमान (वय १६) व शाहिदखा रहेमानखा मेवाती (वय १७) या दोन्ही युवकांचा यात समावेश असून, दानिश शेख अरमान याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, शाहीदखा मेवाती याचा नदीत शोध सुरू आहे. 

कसाली भागातील सुमारे आठ ते दहा युवक बहादरपूर रस्त्यावरील हिंगोणे शिवारातील बोरी नदीत आज पोहण्यास गेले होते. पोहत असताना दानिश शेख अरमान यांचा ३० फूट खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे पाहून त्याला वाचविण्यासाठी गेलेला शाहिदखा रहेमानखा मेवाती याचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना पाहून भेदरल्याने उर्वरीत सहा ते सात युवक तेथून निघून गेले. परिसरातील भील नामक या तरूणाने दानिश शेख अरमानचा मृतदेह बाहेर काढला. मात्र, दुसरा मृतदेह त्याला मिळून आला नाही. या घटनेची माहिती शहरात धडकताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पालिकेचे अग्निशमनचे पथक लाइफ जॅकेट व यंत्रसामग्री घेऊन तेथे दाखल झाले. काही पट्टीचे पोहणारे तरूण, पालिकेचे कर्मचारी व पोलिसांच्या पथकाकडून दुसऱ्या युवकाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. 

वाळूच्या खड्ड्यांनी घेतला जीव 
हिंगोणे शिवारातील बोरी पात्रात जेसीबीच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन करण्यात आले आहे. परिणामी मोठमोठे खड्डे पात्रात पडले आहे. या खड्यातील पाण्यातच या युवकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. अवैध वाळू उत्खननामुळे युवकांचा बळी गेल्याने परिसरात संताप व्यक्‍त होत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner bori river 2 boy death