कोरोनासे डरोना म्हणत अमळनेर पूर्वपदावर...रणरणत्या उन्हात नागरिकांची बाजारात झुंबड 

कोरोनासे डरोना म्हणत अमळनेर पूर्वपदावर...रणरणत्या उन्हात नागरिकांची बाजारात झुंबड 

अमळनेर ः गेल्या दोन महिन्यात शहरात कोरोनाने शंभरी ओलांडली. त्यानंतर जनता कर्फ्यूचा 'डोस' देण्यात आला. मात्र, तरीही कोरोना हद्दपार होण्याचे नाव घेत नाही. अशा स्थितीतही आता 'कोरोना से डरोना' म्हणत अमळनेर शहर पूर्वपदावर आले आहे. सर्व व्यवहार सुरू झाले असून, बाजारपेठ खुली झाली आहे. आज दुपारी रणरणत्या उन्हातही नागरिकांची झुंबड दिसून आली. 

शहरातील कोरोनाची स्थिती 
शहरातील साळीवाडा, झामी चौक, अमलेश्‍वर नगर, बहादरपूर नाका, शाह आलम नगर, कासार गल्ली, अंदरपूरा, कसाली मोहल्ला, मुठे गल्ली, पानखिडकी, साने नगर, इस्लामपुरा, बोरसे गल्ली आदी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. पाहाता पाहाता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११३ वर पोचली आहे. त्यातील सुमारे ९० जण कोरोनामुक्‍त झाले असून, त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यानंतर गेल्या दोन दिवसात तीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. सध्या कोविड सेंटरमध्ये एकही पॉझिटिव्ह रूग्ण नाही. पैलाड मधील एका मुलीस कोरोनाची लागण झाली होती. तीला घरी पाठविण्यात आले होते. मात्र, तीला पुन्हा ताप आल्याने पुन्हा नवीन स्वॅब घेण्यात आला आहे. 

विविध रस्ते मोकळे 
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील कोरोनाची स्थिती पाहता कंटेन्मेंट झोनसह विविध भागात रस्ते बंद करण्यात आले होते. मात्र, हे रस्ते आता खुले करण्यात आले असून, नागरिकांची वर्दळही वाढली आहे. कंटेन्मेंट झोन वगळता इतरत्र असलेले वळण रस्त्यांवरचे पत्रे, टोकर आदी साहित्य काढून रस्ता मोकळा झाला आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळही वाढल्याचे दिसून आले आहे. 

ही दुकाने आहेत खुली… 
शहरात भाजीपाला, फळ विक्रेते, किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कपड्यांची दुकाने, तसेच विविध शॉपिंग मॉलही उघडल्याने ग्राहकांची गर्दी वाढली आहे. सलून व हॉटेल व्यावसायिकांची दुकाने मात्र बंदच दिसून आली. वाईन शॉपही खुले झाले असून, या दुकानांवर गर्दीचे प्रमाणही कमी झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून वाइन शॉप नियमित खुले असल्याने तळीरामांची गर्दीही कमी झााल्याचे दिसून आले. 

नियमांचे पालन करावे 
शासनाच्या नियमांचे पालन करून दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तरीही बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे भान कुणालाही दिसून येत नाही. यासाठी व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानांचा परिसर निर्जंतुक ठेवावा. तसेच सोशल डिस्टन्सिंगची व्यवस्था करून ग्राहकांना अंतर पाळण्यास भाग पाडावे, असे आवाहन प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी केले आहे. 

कोरोना योध्यांचे कौतुक 
शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये अनेक डॉक्टर्स जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. अनेक नर्स, आशा स्वयंसेविका, वॉर्ड बाय रुग्णांची काळजी घेत आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताळे, डॉ. संदीप जोशी, डॉ. गणेश पाटील, डॉ. नितीन पाटील, डॉ. शरद बाविस्कर, डॉ. प्रशांत शिंदे आदींसह अनेक डॉक्टर्स रुग्णांच्या उपचाराची काळजी घेत आहेत. आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, प्रशासनाकडून प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, गटविकास अधिकारी संदीप वायाळ आदींसह अनेक योद्धे रस्त्यांवर उतरून कोरोनाशी लढा देत आहेत. त्यांचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com