अमळनेरकरांची तहान भागविण्यासाठी पालिकेची कसरत 

योगेश महाजन
सोमवार, 27 मे 2019

अमळनेर ः हतनूर धरणात अत्यल्प जलसाठा असल्याने शहरासाठी यंदा दोनच आवर्तन मिळाले. जळोद डोहही आटत असल्याने शहरास तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा सात दिवसांवर गेला आहे. यावर मात करण्यासाठी पालिकेने गंगापूरी डोहापाठोपाठ आता कलाली डोहातील 'डोम'चा अडसर दूर करून पाणी खेचून आणण्यास यश मिळविले. मात्र, अमळनेरकरांची तहान भागविण्यासाठी पालिकेस चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. 

अमळनेर ः हतनूर धरणात अत्यल्प जलसाठा असल्याने शहरासाठी यंदा दोनच आवर्तन मिळाले. जळोद डोहही आटत असल्याने शहरास तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा सात दिवसांवर गेला आहे. यावर मात करण्यासाठी पालिकेने गंगापूरी डोहापाठोपाठ आता कलाली डोहातील 'डोम'चा अडसर दूर करून पाणी खेचून आणण्यास यश मिळविले. मात्र, अमळनेरकरांची तहान भागविण्यासाठी पालिकेस चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. 
अमळनेर शहरासाठी जळोद येथील तापी नदीवरून शहरास बारमाही पाणीपुरवठा केला जातो. जळोद येथील पंपगृहातून ३४० अश्‍वशक्‍तीच्या पंपाद्वारे शहरास पाणीपुरवठा केला जातो. तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून कलाली येथून ६४ अश्‍वशक्‍तीच्या तीन तरंगत्या पंपाद्वारे गांधली येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या तीन वर्षापासून समाधानकारक पाऊसच नसल्याने जळोद येथील डोह आटल्याने शहराचा पाणीपुरवठा लांबणीवर पडला. मात्र, यावर उपाययोजनांसाठी पालिका प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येत आहे. 

गंगापूरी, कलाली डोह वरदान 
हतनूरच्या आवर्तनाचे पाणी गंगापूरी येथे अडविण्यात आले असून, या डोहात सुमारे एक हजार मीटर लांबीची चारी खोदून जळोद डोहातील पंपापर्यंत हे पाणी खेचून हा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात पालिकेने यश मिळविले. सद्यःस्थितीत ३४० अश्‍वशक्‍तीच्या पंपाद्वारे सुमारे एक कोटी लीटर पाण्याचा तेथून उपसा सुरू आहे. दुसरी पर्यायी व्यवस्था म्हणून तातडीची पाणीपुरवठा योजना असलेल्या कलाली डोहातून पाणी घेण्यात येत आहे. यो डोहाची लांबी सुमारे पाच किलोमीटर असून दोनशे मीटर रुंदी आहे. तेथून सद्यःस्थितीत सुमारे ५० लाख लीटर पाणी या डोहातून उचलण्यात येत आहे. त्यातही नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या डोमचा अडसर असल्याने पाणी मिळणे शक्य नव्हते. मात्र, माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने यावर मात करण्यात आली. सुमारे २१० फुटाच्या हा डोमचा अडसर पालिका प्रशासन नुकताच दूर करू पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरळीत करण्यात यश मिळविले आहे. परिणामी आठ दिवसांवर होणारा पाणीपुरवठा होण्यास सातत्य राहील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. गंगापूरी व कलाली डोह शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वरदान ठरत आहे. 

'जीवनधारा' लाभदायक 
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून शहरातील विविध भागात 'जीवनधारा' या नावाच्या ठिकठिकाणी टाक्या व वाहनांवर शुद्ध ॲक्वाच्या पाण्याची सोय करून दिली आहे. एक रुपयात एक लीटर पाणी यातून मिळते. हे पाणी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते. टंचाईच्या काळात जीवनधारा नागरिकांची तहान भागवत आहे. शुद्ध व थंड पिण्याचे पाणी मिळत असल्याने नागरिकांना त्याचा लाभ होत आहे. मुख्य रस्ते, प्रमुख बाजारपेठांमध्ये हे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

यंदा पाणीटंचाईची समस्या गंभीर असल्याने पालिका प्रशासनास शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. विविध उपाययोजना 
राबवून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र, नागरिकांनीही पाण्याची नासाडी करू नये. पाण्याची बचत करून पालिकेस सहकार्य करावे. 
- पुष्पलता पाटील, नगराध्यक्षा, अमळनेर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amlner nagarpanchayat water