तासाभरात दहा लाख सॅनिटरी पॅड वाटपाचा विक्रम,अमृता फडणवीस यांनी जागवला आत्मविश्वास

live
live

नाशिक ः नवरात्रोत्सवाच्यानिमित्ताने सर्वत्र शक्तीदेवीचा जागर सुरु असतानाच नाशिककरांनी स्त्रीत्वाच्या सन्मानाचा संकल्प केलाय. जिल्हा परिषद, अहिल्या फाऊंडेशनतर्फे जिल्हातील 1 हजार 64 शाळांमधील दीड लाखांहून अधिक मुलींना एका तासात दहा लाख सॅनिटरी पॅडचे वाटप करत विश्‍वविक्रमाची नोंद करण्यात आली. त्यानिमित्ताने आज झालेल्या सोहळ्यात अमृता देवेंद्र फडणवीस यांनी सॅनिटरी पॅड वापरण्याची लाज बाळगू नका, तुम्ही ऍम्बेसिडर व्हा !, असा नारा देत मुलींमध्ये आत्मविश्‍वास जागवला. 

 कालिदास कलामंदिरात झालेल्या सोहळ्यासाठी डॉ. अनिला दीपक सावंत, अनिता दादा भुसे, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावीत, सभापती अपर्णा खोसकर, मनिषा पवार, सुनिता चारोस्कर, मनिषा यतींद्र पगार, शेफाली भुजबळ, आमदार दीपिका चव्हाण, आमदार प्रा. देवयानी फरांदे, शांती राधाकृष्णन्‌, अर्चना मुंडे, रोहिनी दराडे, जयश्री गीते, लंडनच्या वंडर बुक ऑफ रेकॉर्डच्या अमी छेडा, सीमा रंजन ठाकरे, जान्हवी जयंत जाधव आदींसह जिंदाल आणि ग्लेन मार्कच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.

के. टी. एच. एम. महाविद्यालय, व्ही. एन. नाईक महाविद्यालय, एस. एम. आर. के. महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी वेंडींग आणि डिस्पोजल मशिनचे आणि शहरातील शासकीय कन्या, सारडा कन्या, आदर्श, वाय. डी. बिटको कन्या, अण्णासाहेब वैशंपायन विद्यालय या शाळांमधील विद्यार्थींनींना सॅनिटरी पॅडचे वाटप सौ. फडणवीस यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सॅनिटरी पॅड वाटपाच्या झालेल्या विक्रमाबद्दलचे प्रमाणपत्र आणि पदक अमी छेडा यांनी सौ. सांगळे व सुप्रिया जाधव यांना प्रदान करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

नाशिक सदैव "नंबर-वन!' 
नाशिक सदैव "नंबर-वन' राहिले असून सांस्कृतिक नगरीमध्ये मुलभूत गोष्टी जिवंत ठेवण्यात आल्यात, असे गौरवोद्‌गार काढून सौ. फडणवीस म्हणाल्या, की मुलीच्या मासिक पाळीची सुरवात ही सणासारखी आपल्याकडे साजरी केली जायची. स्वच्छतेविषयक माहिती तिला दिली जायची. तसेच लढाऊ विमानाची पहिली पायलट अग्नी चतुर्वेदी, क्रिकेट जिंकणाऱ्या भारतीय मुली, ऑलिम्पिकमध्ये अधिक पदके पटकावणाऱ्या आपल्या मुली अशी कितीतरी यशाची उदाहरणे सांगता येतील. त्यामुळे प्रत्येकीने आपण मुलगी अन्‌ महिला असल्याचा गर्व बाळगायला हवा. 

कापडाचा वापर करणे टाळा
कापडाचा वापर करु नका. मासिक पाळीवेळी कापडाचा वापर केल्याने संसर्ग होतो. हे टाळण्यासाठी सॅनिटरी नॅपकीनचा वापर करावा. आपल्या देशात 80 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिनचा वापर करत नाहीत. त्यावर उपाय म्हणून प्रत्येक मुलीने सॅनिटरी पॅडचा वापर करत आपल्या वीस मैत्रिणींना त्याचा वापर करायला लावावा. सरकारतर्फे सॅनिटरी पॅडची किंमत कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे सांगून सौ. फडणवीस यांनी मासिक पाळीवेळी महिन्यातील चार दिवस घरी बसून वाया घालवू नये, असा सल्ला दिला. आपल्या मुली देशाचे भविष्य आहेत, असे सांगून त्या म्हणाल्या, की चांगले व्हावे म्हणून देवाकडे नवस बोलले आहे, असे म्हणत हातावर हात ठेऊन गप्प बसू नये. मेहनत करुन मिळणाऱ्या फळाचे समाधान घ्यावे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनी चेंडूवरील लक्ष हेच यशामागील गमक असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे आपणही एकलव्य व्हावे. 

महिला आणि मुलींसाठी काम करताना समाधान मिळत असल्याचे सौ. सांगळे यांनी सांगितले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या "अस्मिता' योजनेच्या शुभारंभाची माहिती त्यांनी दिली. स्त्रीचे आरोग्य पुरुष सांभाळतील, असा आशावाद मांडून सौ. भुजबळ यांनी आपल्या पाचवीत शिकणाऱ्या मुलीच्या आरोग्याबद्दल पती समीर भुजबळ हे काळजी घेतात, असे आवर्जून नमूद केले. डॉ. सावंत यांनी "बेटी बचाओ, बेटी पढाओ', असा आग्रह धरला. अश्‍विनी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. नयना गावीत यांनी आभार मानले. 

पडद्यामागील "पॅडमॅन' 
सॅनिटरी नॅपकिनच्या माध्यमातून मुलींच्या आरोग्याच्या काळजी घेण्याची जनजागृती कार्यक्रमाचे पडद्यामागील "पॅडमॅन' राहिलेत माजी आमदार जयंत जाधव. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांची त्यांना साथ मिळाली. श्री. जाधव यांची कन्या सुप्रियाने मुलींसाठीच्या नव्या पर्वामध्ये वडिलांचा वाटा असल्याचा गर्व व्यक्त केला. वडील वेळ देत नाहीत ही तक्रार असायची, पण भगिनींसाठी वडील देत असलेली वेळ थोडकी नसल्याचे तिने सांगताच, उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. 

मुख्यमंत्र्यांनी ओळख ठेवली कायम 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विवाह झाला असताना मी ऍक्‍सिस बॅंकेत नोकरी करायची. त्यावेळी अनेकांनी मला घरी राहण्याचा आग्रह धरला होता. पण पतीने तुझी एक ओळख आहे ती राह्यला हवी, असे सांगत माझ्या मुलीला आई घरी असते हे वाटणे आवडणार नाही, असे सौ. फडणवीस त्यांनी सांगताच, मुलींनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. 

शासकीय कन्याच्या खो-खोपटूंचा गौरव 
सुरगाणा तालुक्‍यातील आदिवासी विद्यार्थिनींना नाशिकमध्ये आणून त्यांची निवास अन्‌ शासकीय कन्या विद्यालयात शिक्षणाची व्यवस्था जिल्हा परिषदेने केली आहे. या विद्यार्थिनींनी खो-खो स्पर्धेत यश मिळवले. चौदा वर्षाखालील विद्यार्थिनी नागपूरमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत पोचल्यात. त्यामुळे या खो-खोपटूंसह प्रशिक्षिका गितांजली सावळे, मुख्याध्यापिका कविता साठे यांचा सन्मान सौ. फडणवीस यांच्या हस्ते झाला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com