अवयवदानामुळे सहा रुग्णांना जगण्याची नवी उमेद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

नाशिक : गेल्या रविवारी (ता. 18) "हिट ऍन्ड रन'चे बळी ठरल्यानंतर उपचारादरम्यान मेंदू मृत झालेल्या अरुण गणपत तांबोळी (कोठूरकर) यांच्या मृत्यू पश्‍चात अवयवदानामुळे सहा रुग्णांना जगण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे. अवयवदानाच्या माध्यमातून ते कुणाच्या तरी शरीरात जिवंत राहील, या भावनेतून नातेवाइकांनी मोठे हृदय दाखवत अवयवदानाचा निर्णय घेतला. "ग्रीन कॉरिडॉर'द्वारे यकृत व मूत्रपिंड पुण्यातील रुग्णास, तर एक मूत्रपिंड, डोळे व त्वचा नाशिकच्या रुग्णांसाठी दान केले. चेन्नईतील रुग्णाला हृदय दिले जाणार होते. मात्र उदासीन शासकीय यंत्रणेमुळे एचएएल-एटीसीकडून एअर ऍम्ब्युलन्स उतरविण्यास परवानगी न मिळाल्याने शक्‍य असूनही रुग्णापर्यंत हृदय पोचविता आले नाही. 
अत्यंत सामान्य परिस्थिती असलेले अरुण गणपत तांबोळी (कोठूरकर) वयाच्या 52 व्या वर्षीदेखील अंबड येथील आर्टरबर कंपनीत नोकरी करत होते. त्यांच्या पत्नीदेखील खासगी कंपनीत नोकरीस होत्या. दोन मुलींचे लग्न झाले होते, तर एकुलता मुलगा कंपनीत नोकरीला होता. रविवारी भाजी घेण्यासाठी नेहमीप्रमाणे सायकलवर निघाले होते. त्यातच अज्ञात वाहनाने त्यांना धडक देऊन पळ काढला. या "हिट ऍन्ड रन' प्रकरणात त्यांना प्रारंभी ईएसआयसी, जिल्हा रुग्णालय व नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सुरवातीला उपचाराला ते प्रतिसाद देत असताना डोळेदेखील उघडले होते; उपचार सुरू असतानाच शुक्रवारी (ता. 23) ते मृत झाल्याचे डॉक्‍टरांच्या निदर्शनास आले. या प्रकरणात अवयवदानाने काही रुग्णांना जीवदान मिळू शकते, हे कळल्यावर नातेवाइकांनी उत्स्फूर्तपणे अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार हृषीकेश हॉस्पिटल येथे तज्ज्ञ डॉक्‍टरांनी वैद्यकीय तपासणी करत अवयवदानाचा निर्णय घेतला. 

नाशिक-पुणे ग्रीन कॉरिडॉर यशस्वी, चेन्नईला हृदय पोहचविण्यात अपयश 
अवयवदानानंतर यकृत पुण्यातील बाणेर येथील ज्यूपिटर रुग्णालय, तर मूत्रपिंड नगर रोडवरील सह्याद्री रुग्णालयात ग्रीन कॉरिडॉरद्वारे पाठविण्यात आले. दुपारी उशिरानंतर नाशिक-पुणेदरम्यान ग्रीन कॉरिडॉर यशस्वीदेखील झाला. मात्र चेन्नईतील रुग्णास हृदयाची आवश्‍यकता असताना व नातेवाइकांची प्रत्यारोपणाची तयारी असताना केवळ व्यवस्थेच्या उदासीनतेमुळे हृदयाचा उपयोग करून घेता आला नाही. हृदयासाठी चेन्नईतील रुग्णालयाच्या नातेवाइकांशी संपर्क साधला होता. एअर ऍम्ब्युलन्सद्वारे हृदय चेन्नईला नेण्याची त्यांची तयारी असताना एचएएल-एटीसी यांच्याकडून विमान उतरविण्याची परवानगी न मिळाल्याने हृदय प्रत्यारोपण होऊ शकले नाही. 
 

Web Title: MARATHI NEWS AVAYAVDAN