केळीला विक्रमी भाव ः उत्पादन कमी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

रावेर ः जिल्ह्यात कापणी योग्य केळी जेमतेम शिल्लक आहे. दुर्गोत्सवानंतरही केळीला विक्रमी भाव मिळत आहेत. एरव्ही पावसाळ्यात या काळात तालुक्यासह जिल्ह्यातून किमान तीन-चारशे ट्रक्स केळी उत्तर भारतात रवाना होत होती. यावर्षी मात्र तालुक्यातून जेमतेम पंचावन्न ट्रक्स केळी उत्तर भारतात रवाना झाली. 

रावेर ः जिल्ह्यात कापणी योग्य केळी जेमतेम शिल्लक आहे. दुर्गोत्सवानंतरही केळीला विक्रमी भाव मिळत आहेत. एरव्ही पावसाळ्यात या काळात तालुक्यासह जिल्ह्यातून किमान तीन-चारशे ट्रक्स केळी उत्तर भारतात रवाना होत होती. यावर्षी मात्र तालुक्यातून जेमतेम पंचावन्न ट्रक्स केळी उत्तर भारतात रवाना झाली. 

यावर्षी उन्हाळ्यात केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाढलेले तापमान आणि पाण्याअभावी शेतकऱ्यांनी केळी उपटून फेकली. चक्रीवादळानेही केळीला मोठा तडाखा बसला होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आणि तालुक्यात कापणी योग्य केळी जेमतेम शिल्लक आहे. आगामी काळात उत्तर भारतात करवा चौथ, दिवाळी आणि छटपूजा आदी सण-उत्सव येत आहेत. या पार्श्वभूमीवर दुर्गोत्सवानंतर देखील केळीचे भाव वाढतच आहेत. आज (ता ९) केळीच्या भावांमध्ये वीस रुपये क्विंटल आणि चार रुपये फरक अशी एकूण ४४ रुपयांची वाढ झाली आहे. आज केळीचे भाव १५६० रुपये क्विंटल फरक २४ रुपये असे एकूण १७०४ रुपये होते. उत्कृष्ट केळीला दोनशे रुपये ऑन देऊन (जादा भाव देऊन) व्यापारी खरेदी करीत आहेत. सामान्यपणे दुर्गोत्सवाच्या आधी केळीच्या भावात वाढ होत असते, मात्र दुर्गोत्सवानंतर होणारी केळीच्या भावातील वाढ ही शेतकऱ्यांसाठी सुखद आहे. मात्र ज्या मोजक्या शेतकऱ्यांकडे कापणी योग्य केळी आहे त्यांनाच या भावाचा लाभ होत आहे. 

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे दररोज केळीचे खुले जाहीर होतात. या लिलावात तालुक्यातील काही केळी उत्पादक शेतकरीही आपली केळी नेत असतात. काल (ता. ८) या बाजारपेठेत केळीला विक्रमी २३५१ रुपये क्विंटल असा भाव मिळाला. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्लीच्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर तालुक्यातील नाचणखेडा येथील सुनील शांताराम चौधरी यांच्या केळीला हा आतापर्यंतचा उच्चांकी-विक्रमी भाव मिळाला आहे. बऱ्हाणपूर बाजारात गेल्या महिनाभरापासून चांगल्या केळीला किमान दोन हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहेत. याबाबत रावेर बाजार समितीच्या केळी बाजार भाव समितीचे प्रमुख रामदास पाटील यांनी सांगितले की, उत्तर भारतात अजूनही केळीची मागणी आहे. त्यामुळे केळीचे भाव तेजीत आहेत. येथील केळी व्यापारी किशोर गनवाणी यांनी सांगितले की उत्कृष्ट आणि दर्जेदार केळीला दोनशे रुपये जादा भावाने घेण्यास व्यापारी तयार आहेत मात्र केळी मुबलक उपलब्ध नाही. एक ट्रक केळी भरण्यासाठी आठ ते दहा केळी बागांमधून थोडी-थोडी केळी कापणी करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळातही केळीचे भाव तेजीतच राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news banana high rate utpadan down