वरखेड-लोंढे प्रकल्पाचा कालवा असणार बंदिस्त 

varkhed londhe
varkhed londhe

भडगाव : गिरणा नदीवरील वरखेड-लोंढे प्रकल्पाचा कालवा व पाटचाऱ्या या बंदिस्त असणार आहेत. त्यादृष्टीने पाटबंधारे विभागाकडून बंदिस्त व उघड्या कालव्यांचा तुलनात्मक आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. बंदिस्त कालव्यामुळे ४०-५० खर्च वाचणार आहे. शिवाय २० टक्के होणारा पाण्याचा अपव्यय टळणार आहे. शंभर टक्के बंदिस्त कालव्यांचा हा जिल्ह्यातला पहिला प्रकल्प असणार आहे. 


गिरणा नदीवर वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या पावसाळ्यात या प्रकल्पात पाणी अडविण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने कामाला गती देण्यात आली आहे. या प्रकल्पातून चाळीसगाव तालुक्यातील २०, तर भडगाव तालुक्यातील ११ गावांचे ७५४२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. 
वरखेडे प्रकल्पाच्या माध्यमातून एकच उजवा कालव्याद्वारे शेतापर्यंत पाणी पोहोचणार आहे. हा कालवा ३८ किलोमीटर लांबीचा असणार आहे. प्रकल्पातून शेतीपर्यंत पाणी बंदिस्त पाईपलाईनव्दारे जाणार आहे. मुख्य कालवा, उपकालवा व पाटचाऱ्याही बंदिस्त असणार आहे. शंभर टक्के बंदिस्त पाईपलाईनव्दारे पाणी देणारा वरखेडे हा पहिला प्रकल्प ठरणार आहे. जिल्ह्यात वाघुर प्रकल्पाच्या पाटचाऱ्या बंदिस्त आहेत. पण मुख्य कालवा हा उघडा आहे. मात्र, वरखेडे प्रकल्पाचे पाणी शंभर टक्के बंदिस्त पाईपलाईनव्दारे शेतापर्यंत पोहचविण्याचे नियोजन आहे. 

४०-५० टक्के खर्चाची बचत 
बंदिस्त पाईपलाईनमुळे पाटचारीच्या खर्चात तब्बल ४०-५० टक्के खर्च वाचणार आहे. पारंपरिक कालव्यांना जमीन अधिग्रहणावर मोठा खर्च करावा लागतो. वरखेडे प्रकल्पाचा प्रस्तावित ३८ किलोमीटर लांबीचा कालवा व वितरिकांसाठी तब्बल ४५० हेक्टर जमीन अधिग्रहीत करावी लागणार आहे. त्यासाठी साधारणपणे २००-२५० कोटी खर्च अपेक्षित आहे. मात्र, बंदिस्त कालव्यामुळे हा खर्च पूर्णपणे वाचणार आहे. नाममात्र स्वरूपात जमीन अधिग्रहहीत करावी लागणार आहे. बंदिस्त कालवा हा जमिनीतून जाणार असल्याने जमीन अधिग्रहणाचा खर्चाला फाटा मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जमीन अधिग्रहणासाठी लागणारा वेळ, शेतकऱ्यांचा विरोध यामुळे प्रकल्प प्रकल्प रखडतो. त्यामुळे हा वेळ वाचुन प्रकल्प जलद गतीने पुर्ण होण्यास मदत होणार आहे. 

२० टक्के पाण्याचा अपव्ययही टळेल 
उघड्या कालव्यांमुळे पाण्याचा मोठ्याप्रणात अपव्यय होतो. बाष्पीभवन, लिकेजेसमुळे वाया जाते. पाण्याच्या चोरीमुळे पाण्याचा अपव्यय होतो. यात साधारपणे २० टक्के पाण्याचा अपव्यय होतो. मात्र बंदिस्त पाईपलाईनव्दारे पाण्याचा हा होणारा अपव्यय टळणार आहे. याशिवाय पाण्याची चोरी शंभर टक्के थांबणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाइपलाइन येणार असून व्हाल्वव्दारे ज्या शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली आहे, त्यांनाच पाणी मिळणार आहे. त्यामुळे पाण्याची मागणी केल्याशिवाय कोणालाच पाणी घेता येणार नाही. शिवाय अनेकदा पाटचारीच्या दुरवस्थेमुळे पाटचारीच्या शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी पोहचत नाही. मात्र, यामुळे लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी पोहोचणार आहे. 

तुलनात्मक आराखड्याचे काम सुरू 
राज्याच्या जलसंपदा विभागाने पाटबंधारे विभागाला उघडा कालवा व बंदिस्त कालव्याचा तुलनात्मक आराखडा बनविण्याबाबत सुचना केल्या आहेत. त्यानुसार हा आराखडा बनविण्याचे काम सुरू असून लवकरच हा आराखडा पूर्णत्वास येईल. त्यानंतर हा ‘डीपीआर' शासनाकडे सादर केला जाईल. त्यानंतर या आराखड्याला मंजूरी मिळाल्यानंतर तांत्रिक मान्यता मिळेल. बंदिस्त पाईपलाईनमुळे खर्चात पन्नास टक्क्यापर्यंत खर्च वाचणार असल्याने शासन ही याला हिरवा कंदील देऊ शकते. अर्थात यासाठी लोकप्रतिनिधींनी राजकीय ताकद वापरून बंदिस्त कालव्याच्या मान्यतेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

येत्या पावसाळ्यात अडणार पाणी 
वरखेडे प्रकल्पाला केंद्र शासनाच्या बळिराजा कृषी संजीवीनी योजनेतून नाबार्डकडून शंभर टक्के निधी दिला जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. येत्या पावसाळ्यात या प्रकल्पात पाणी अडविले जाईल असे प्रकल्पाच्या सूत्रांनी सांगितले. या प्रकल्पाला ५२६ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. मात्र २०१३-१४ च्या दरसुचीनुसार हे अंदाजपत्रक आहे. त्यामुळे सध्याच्या दरसुचीनुसार या प्रकल्पाची किंमत ८००-९०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र बंदिस्त कालव्याला मान्यता मिळाल्यास पूर्वीच्या रकमेतच प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येऊ शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com