गिरीश महाजनांसमोर बंडखोरी रोखण्याचे आव्हान 

गिरीश महाजनांसमोर बंडखोरी रोखण्याचे आव्हान 

भडगाव : भाजप- शिवसेना यांची युती होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याच्या मतदारसंघात चार वर्षांपासून भाजपकडून तयारी करीत असलेल्या उमेदवारांचे काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ते कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी करण्यावर ठाम दिसून येत आहेत. यामुळे उत्तर महाराष्ट्रात महायुतीच्या 42 जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजनांसमोर बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. 
गेल्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना-भाजप युतीची झालेली फारकत साडेचार वर्षे कायम राहिली. त्यानंतर समविचारी असलेले हे पक्ष लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकत्र आले. त्यामुळे लोकसभेच्या राज्यातील 48 पैकी 42 जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीवेळीच विधानसभा निवडणुकीतही युती करण्याचे दोन्ही पक्षांनी जाहीर केले होते. मात्र, विधानसभा निवडणूक जवळ आल्यावरही पुन्हा दोन्ही पक्षांची फारकत होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, उभय पक्षांमध्ये युती होण्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे चार वर्षांपासून शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपकडून व भाजपच्या मतदारसंघात शिवसेनेकडून तयारी करीत असलेल्या उमेदवारांचा स्वप्न भंग होणार आहे. 

तीन मतदारसंघांत पेच 
गेल्या विधानसभा निवडणुकीत 35 वर्षांपासूनची शिवसेना-भाजप युती तुटली. त्यानंतर भाजपने राज्यात शिवसेनेच्या मतदारसंघांत भाजपकडून काही उमेदवारांना तयारीला लावले. त्यात काहींनी पक्षांतर करून तयारी सुरू ठेवली. मात्र, आता पुन्हा शिवसेना-भाजप युती होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे तयारी करीत असलेल्या उमेदवारांची गोची झाली आहे. जळगाव जिल्ह्यात तीन मतदारसंघांतील भाजप उमेदवार यामुळे अडचणीत आले आहेत. त्यात प्रामुख्याने पाचोरा, एरंडोल व जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा समावेश आहे. 

बंडखोरीचे संकेत 
शिवसेना-भाजपची युती झाल्यास भाजपच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्‍यता आहे. पाचोरा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. येथे भाजपकडून एक- दोन नव्हे तर दोन-तीन जण चार वर्षांपासून तयारी करीत आहेत. अमोल शिंदे यांनी तर शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करीत भाजपमध्ये प्रवेश करून तयारी सुरू ठेवली. याशिवाय भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या प्रा. डॉ. अस्मिता पाटील, "मनसे'मधून भाजपत दाखल झालेले डी. एम. पाटील व भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य मधुकर काटे हे उमेदवारीसाठी तयारीत आहेत. मात्र, युती झाल्यास ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे या इच्छुकांचे काय? त्यात अमोल शिंदे हे युती झाल्यास लढण्याच्या तयारीत आहेत. तीच परिस्थिती एरंडोल-पारोळा मतदारसंघात आहे. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये आलेले पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, गेल्या वेळी शिवसेनेचे शिवबंधन तोडून भाजपकडून विधानसभेला उमेदवारी करणारे मच्छिंद्र पाटील हे जोरदार कामाला लागले आहे. मात्र, हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार हे निर्विवाद जाईल हे सांगण्याची आवश्‍यकता नाही. येथे भाजपकडून इच्छुक दोन्ही उमेदवार निवडणूक लढविण्यावर सध्या ठाम दिसत आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघही सेनेकडे आहे. मात्र येथे भाजपने मेळावा घेऊन उमेदवारी करण्याचा "एल्गार' पुकारला आहे. येथे चंद्रशेखर अत्तरदे भाजपकडून इच्छुक आहेत. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघ युतीसाठी विशेषत: भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतात. 

महाजनांसमोर बंडाळी रोखण्याचे आव्हान 
जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी उत्तर महाराष्ट्रात युतीच्या 42 जागा निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे त्यांच्या जळगाव जिल्ह्यातच युतीमुळे भाजपकडूनच बंडाळी होण्याचे संकेत आहेत. त्यात पाचोऱ्याचे अमोल शिंदे, पारोळ्याचे करण पवार हे गिरीश महाजनांचे जवळचे आहेत. त्यामुळे त्यांनी उमेदवारी केल्यास शिवसेनेच्या उमेदवारांना धोका होऊ शकतो. अशा परिस्थिती युतीच्या उत्तर महाराष्ट्रात 42 जागा जिंकण्याचा दावा करणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजनांना संभाव्य बंडाळी रोखण्यात यश येईल का? हे पाहणे रंजक ठरणार आहे. 

"उत्तर महाराष्ट्रात 42 वर जागा जिंकू' 
जामनेर ः आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत केलेल्या अभूतपूर्व विकासकामांच्या बळावर एकूण 48 पैकी जवळपास 42 जागा आम्ही नक्कीच जिंकू, असा आत्मविश्‍वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. श्री. महाजन यांच्या निवासस्थानी ही पत्रपरिषद झाली. यावेळी त्यांनी गेल्या पाच वर्षांत नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. त्यात धरणे, तलाव, बंधारे, रस्त्यांचे विस्तृत जाळे त्यामुळे उद्योगक्षेत्राला पोषक वातावरण, शेतकऱ्यांसाठी मुबलक पाणी व विजेची व्यवस्था आमच्या सरकारने केली. जामनेर मतदारसंघाचा विचार केल्यास पाच वर्षांतील माझ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत कोट्यवधींची विकासकामे झाली त्यामुळे विरोधक आमच्या पुढ्यात टिकणार नाहीत, असे सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com