भडगावात  बाहेरचे दीड हजार नागरिक ...पालिकेने तयार केला ‘गुगल फार्म’ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

शहरात दाखल झालेल्या सर्वांना ‘होम क्वारांटाइन’ करण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता आकडे यांनी सांगितले. यामध्ये पुणे येथून येणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. 

भडगाव : मुंबई, पुणेसह बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मूळचे भडगावातील असलेले सुमारे दीड हजार नागरिक कालपर्यंत (२५ मार्च) शहरात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा स्वयंसेविकांतर्फे घराघरांत जाऊन शोध घेऊन आरोग्य तपासणी केली जात आहे. बाहेरून शहरात दाखल झालेल्या सर्वांना ‘होम क्वारांटाइन’ करण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता आकडे यांनी सांगितले. यामध्ये पुणे येथून येणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. 

भडगाव तालुक्यात रोजगारानिमित्ताने बाहेरगावी राहणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मुंबई, पुणे भागात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या तुलनेने अधिक आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या चाकरमान्यांनी घरचा रस्ता पकडला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गर्दी वाढल्याचे चित्र आहे. बाहेरून आलेल्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने गावात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांमार्फत बाहेरून आलेल्यांची माहिती संकलित केली जात आहे. कालपर्यंत (२५ मार्च) भडगाव तालुक्यात १ हजार ४५३ व्यक्ती बाहेरून आल्याचे समोर आले आहे. यात पुणे येथून ५६०, मुंबईहून ५३५, नाशिकहून १०५, औरंगाबादहून ३६ तर इतर वेगवेगळ्या गावांतून २७१ जण भडगावात दाखल झाले झाल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. या सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांना ‘होम क्वारांटाइन’ राहण्याबाबत सूचित केल्याचे डॉ. सुचिता आकडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. दरम्यान, बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून येत्या दोन- तीन दिवसात हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. 

पालिकेने तयार केला ‘गुगल फार्म’ 
भडगाव नगरपरिषदेने शहरात बाहेरून आलेल्या व्यक्तींसाठी ‘गुगल फार्म’ तयार केला आहे. या फार्ममध्ये बाहेरून आलेल्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व तो कुठून आलेला आहे आदी माहिती संकलित केली जात आहे. दररोज लोकांनी दिलेल्या माहितीवरून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून घेण्याबाबत सांगितले जात आहे. या सर्वांची यादी पोलीस व ग्रामीण रूग्णालयालाही देण्यात येत आहे. काल (२५ मार्च) या यादीत २७ जणांची नोंदणी झाल्याचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. मात्र, काही जण खोटे नाव व माहिती नोंदवत असल्याचे देखील समोर आले आहे. या संदर्भात आमदार किशोर पाटील यांनी प्रशासनाच्या बैठकीत अशी खोटी माहिती नोंदवणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ‘गुगल फार्म’मुळे बाहेरून आलेल्याची नोंद घेणे सोपे झाले आहे. 

गावात बाहेरून आलेल्या व्यक्तींनी स्वतःहून प्रशासनाला आपली माहिती देणे आवश्यक आहे. त्यांनी आरोग्य तपासणी करून सूचनांचे पालन करावे. लोकांनीही बाहेरून आलेल्यांना चांगली वागणूक द्यावी. त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहू नये. 
- किशोर पाटील, आमदार ः पाचोरा- भडगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhadgawat one thushand five hundred citizens outside Bhadgaon