नाटककार नेताजी भोईर अनंतात विलीन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

    रंगभूमीच हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनविलेले, आयुष्यभर सतत नाटकाचा ध्यास घेतलेले ज्येष्ठ नाटककार, मूर्तीकार नेताजी आबाजी भोईर (वय 90) यांचे अल्प आजाराने निधन झाले. विजय नाट्य मंडळाच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीवर अनेक नाटके सादर केली. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, रंगभूषा, अभिनय या सर्व गोष्टी ते स्वतः करायचे. गेल्या वर्षीच त्यांनी "हे रंग जीवनाचे' हे राज्य नाट्य स्पर्धेतील 50 वे नाटक सादर करून एक वेगळा विक्रम केला. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार झाले.

     नेताजी भोईर यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासूनच रंगभूमीवर काम करायला सुरूवात केली. त्यांचे तिन्ही काका नाटकात काम करत असल्यामुळे तेही नाटकाकडे ओढले गेले. सुरूवातीला त्यांनी बोहाडे, गणेशोत्सव, यात्रा यामधून छोटे छोटे नाटके सादर केली. 1948 साली त्यांनी विजय नाट्य मंडळाची स्थापना केली. शेवटपर्यंत या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी राज्य नाट्य स्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धा, संगीत नाट्य स्पर्धांमधून त्यांनी नाटके सादर केली. भारत-पाकिस्तान युद्ध, सर्कशीतले जीवन, परिचारीकांचे प्रश्‍न, शेतकरी, महिला अशा अनेक विषयांवरील नाटकांचे त्यांनी रंगभूमीवर सादरीकरण केले. त्यांच्या नाटकांचे वैशिष्ट्ये म्हणजे ते नवोदित कलाकारांना संधी देत असे. त्यातून पुढे जाऊन अनेकांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांनी 1961 च्या दरम्यान सर्कशीत बॅन्डमास्टर म्हणूनही काम केले. बॉम्बे, कमला, जेमिनी, ज्युपिटर यासारख्या वेगवेगळ्या सर्कसमध्ये काम केल्यानंतर आलेल्या अनुभवाच्या आधारावर त्यांनी गेल्या वर्षी "हे रंग जीवनाचे' हे नाटक सादर केले होते. प्रत्यक्ष सर्कस रंगभूमीवर साकारण्याची किमया या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी केली. 
     भोईर यांचा पारंपारिक व्यवसाय हा मूर्तीकाराचा होता. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या मूर्ती या त्यांनी बनविलेल्या आहेत. रामटेक (जि. नागपूर) येथील प्रसिद्ध एकवीस फुटी राम आणि हनुमानाची मूर्ती, त्र्यंबकेश्‍वरच्या वेगवेगळ्या आखाड्यांतील मुर्ती, भक्तीधाम येथील मूर्ती, अंजनेरी येथील पायथ्याशी असलेली हनुमानाची मूर्ती यासारख्या अनेक मूर्ती त्यांनी घडविलेल्या आहेत. 

अंतिम प्रवासही सजवलेल्या अवस्थेतच 
आयुष्यभर रंगभूमीवर काम केल्यानंतर आपला शेवटचा प्रवास हा देखील रंगभूमीवरच जात आहे अशाच थाटात असावा, अशी त्यांची इच्छा होती. म्हणून तिरडीवर त्यांच्या चेहऱ्याला मेकअप करण्यात आला. हे सुरू असताना प्रत्येक कलावंतांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. ज्यांनी रंगभूषेचे धडे दिले त्यांच्या अंतिम प्रवासाप्रसंगी आपल्याला मेकअप करावा लागेल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते, असे रंगभूषाकार एन. ललित यांनी सांगितले. 

Web Title: MARATHI NEWS BHOIER PASSAWAY