खडसेंच्या पराभवासाठी जामनेरची "रसद' 

खडसेंच्या पराभवासाठी जामनेरची "रसद' 

भुसावळ ः भोसरी भूखंडप्रकरणी गैरव्यवहाराच्या आरोपानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले भाजप नेते एकनाथ खडसेंनी आपल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत पूर्ण ताकद झोकून दिली आहे. मात्र, याचवेळी खडसेंच्या पराभवासाठी त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी जामनेर मार्गे शिवसेनेला छुपा रसद पुरवठा केला जात असल्याचे सांगितले जात आहे. 

खडसेंचा मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगरात नगरपंचायतीत भाजपविरुद्ध बाजी मारून नवीन "पॅटर्न' तयार करण्यासाठी साहजिकच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना "भुसावळचे शिल्पकार' अर्थात माजी आमदार संतोष चौधरी यांचेही पूर्ण सहकार्य असल्याची चर्चा आहे. यामुळे मुक्ताईनगरवर संपूर्ण भगवा फडकविण्यासाठी विरोधकांकडून आखलेली व्यूहरचना भेदून आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी खडसेही जळगाव महापालिकेची रणधुमाळी सोडून संपूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरले आहेत. 

निवडणुकीत विरोधकांकडून खडसेंवर मात करण्यासाठी भरभक्कम प्रयत्न सुरू असले, तरी नगराध्यक्षपदावर भाजप समर्थक आपलाच हक्क सांगत आहेत आणि परिस्थिती त्यासाठी अनुकूल समजली जात आहे. तसे नगरसेवकपदाच्या 17 जागा आपल्याच पक्षाच्या निवडून याव्यात, म्हणून भाजपचा जोरदार प्रचार सुरू आहे. पक्षांतर्गत खडसेंचे नेतृत्व मान्य नसलेला गट या निमित्त सक्रिय झालेला आहे. या निवडणूक निकालानंतर जळगाव महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ खडसेंची सक्रियता स्पष्ट होणार आहे. त्यामुळे "आधी निवडणूक मुक्ताईनगरची, मग जळगाव महापालिकेची' असाच काहीसा पवित्रा खडसे आणि समर्थकांचा आहे. कॉंग्रेसच्या नगरध्यक्षपदाच्या उमेदवार माधुरी जाधव यांना विजयी करण्यासाठी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. जगदीश पाटील हे प्रयत्नशील आहेत. त्यांची उमेदवारी आणि मिळणारी मते अंतिम निकालासाठी परिणामकारक सिद्ध होणार आहे. 

जामनेर पालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या "हल्लाबोल मोर्चा'त विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांची शेवटच्या टप्प्यातील तुफानी सभा होऊनही मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या. हाच तो "जामनेर पॅटर्न'. तसे मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी अद्याप मोठे नेते प्रचाराला वा सभेला आलेले नाहीत. शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचीही सभा झालेली नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना फ्रंटवर ठेवून सर्व तंत्र राबविले जात आहे. त्यामुळे मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक म्हणजे जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांमधील संघर्षाची लढाई मानली जात आहे. 

खडसेंचे शिलेदार 
मुक्ताईनगरवर भाजपचा झेंडा कायम ठेवण्यासाठी खडसेंकडेही बिनीचे शिलेदार आहेत. त्यांच्या मदतीसाठी खासदार रक्षा खडसे, भुसावळचे आमदार संजय सावकारे, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, बेटी पढाओ-बेटी बचावचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, सावद्याच्या नगराध्यक्षा अनिता येवले, जिल्हा संघटन सचिव प्रा. सुनील नेवे, भुसावळचे भाजपचे नगरसेवक आणि विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते मुक्ताईनगरात ठाण मांडून आहेत. 

मुस्लिम मतपेढीसाठी... 
मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी साधारणतः साडेपाच ते सहा हजार मुस्लीम मतदारसंख्या आहे. त्याखालोखाल मराठा समाज, कोळी समाज आणि लेवा पाटीदार समाज आहे. सामाजिक गणित पाहूनच भाजपने नजमा तडवी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. भाजपने मुस्लिम मतपेढीसाठी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com