भाजप नेते एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणाला 

भाजप नेते एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणाला 

भुसावळ : मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, नगराध्यक्ष तसेच 17 वॉर्डांतील नगरसेवकांसाठी उद्या (ता. 15) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्यात बहुतांशी वॉर्डांत चुरशीच्या लढती होत आहेत. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 
निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसची झालेली युती प्रासंगिक असल्याने त्याचा अनिष्ट परिणाम होऊन खडसेंच्या बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरात मुसंडी मारणे विरोधकांना शक्‍य होऊ नये, यासाठी खडसे स्वत: मुक्‍ताईनगरात तळ ठोकून आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ही नैसर्गिक मैत्री नाही. श्री. खडसे यांनी भाजपतर्फे तरुण आणि नवीन उमेदवारांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, असे भाजप समर्थकांचे म्हणणे आहे. 
राज्यासह केंद्रात भाजपची सत्ता असल्याने मुक्ताईनगरचा विकास साधायचा असेल, तर योग्य पर्याय निवडण्यासाठी मतदारांपुढे भाजप तसेच शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस युती हेच मुख्य पर्याय आहेत. दरम्यान, प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावल्याने सोशल मीडिया आणि घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांचा जोर असणार आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेले नगराध्यक्षपद खिशात घालण्यासाठी भाजपच्या उमेदवार नजमा तडवी, शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार माधुरी तायडे आणि कॉंग्रेसच्या उमेदवार ज्योत्स्ना तायडे यांच्यात सरळ लढत होत आहे. 

भाजपतर्फे सर्वच जागांवर उमेदवार 
नगरपंचायत निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासह सर्वच जागांवर उमेदवार दिले आहेत. त्याखालोखाल शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या चौदा जागा लढविल्या जात आहेत. तर कॉंग्रेसने नगराध्यक्षपदासह सात जागा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीन जागांवर उमेदवार दिले आहेत. 

गड राखण्यासाठी नियोजनबद्ध प्रचार 
विविध पक्षांचे जागावाटप काहीही असो; पण एक मात्र नक्की, की या निवडणुकीत एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि गड हातातून निसटू नये म्हणून भाजपने नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवत पूर्णपणे ताकद लावली आहे. 

20 जुलैस होणार मतमोजणी 
15 जुलैस मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे, यासाठी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून फिल्डिंग लावली जात आहे. भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांसह राज्याचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीसाठी तब्बल 29 मतदान केंद्रे असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांनी दिली. वानाडोंगरी (ता. नागपूर) येथील पालिका निवडणुकीसाठी दाखल अर्जांमध्ये छाननीअंती उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी 20 जुलैला होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शिवसेनेचा विजयाचा दावा 
मुक्ताईनगरात नगराध्यक्षपदासह बारा जागांवर आपलाच विजय होईल, असा दावा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शहराचा विकास खुंटला असून, पाणीटंचाईसह विविध समस्या भेडसावत असल्याने नागरिकांची भाजपबद्दल नाराजी असल्याचे सांगत रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असल्याने यावेळी परिवर्तन निश्‍चित घडेल, असा विश्‍वासही व्यक्त होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com