Vidhan sabha 2019 : वंचित, ‘एमआयएम’मधील फूट युतीच्या पथ्यावर! 

Vidhan sabha 2019 : वंचित, ‘एमआयएम’मधील फूट युतीच्या पथ्यावर! 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला सत्तेपासून ‘वंचित’ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वंचित बहुजन आघाडीतून ‘एमआयएम’ने ‘एक्झिट’ घेतली. तिसऱ्या क्रमांकाची मते खेचून ‘वंचित’ने राज्यातील जातीचे राजकीय समीकरणच बदलले आहे. मात्र मुस्लिम मते मिळविण्यास ‘वंचित’ला अपयश आल्याचे दिसते. मुस्लिम समाजाने आपली एकगठ्ठा मते कॉंग्रेसच्या पारड्यात टाकली होती. आता दोघांनीही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. ‘वंचित’कडून जिल्ह्यातील सर्व जागा लढविल्या जातील, तर एमआयएम मात्र भुसावळसह मोजक्याच जागी उमेदवार देणार आहे. त्यामुळे ‘वंचित’मध्ये पडलेली फूट ही युतीच्या पथ्थ्यावर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे. 

विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहेत. त्यापैकी वंचित आघाडी जिल्ह्यात सर्वच जागांवर आपले उमेदवार देणार आहे. लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहता मुस्लिम समाजाचा पाठिंबा वंचितला नव्हताच, तर तो काँग्रेसला असल्याचे दिसत आहे. तर दलित मते मोठ्या प्रमाणात वंचितला मिळाली असल्याचेही दिसते आहे. आता हे दोन्ही पक्ष आपल्या सामाजिक गणितांच्या आधारावर स्वतंत्र लढणार आहेत. याचा परिणाम कॉंग्रेस आघाडीची पारंपरिक व्होटबँक असलेल्या मतांवर पडणार आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत बाराबलुतेदारांना उमेदवारी दिली. या उमेदवारांनी बहुतेक मतदारसंघांमध्ये तिसऱ्या-चौथ्या क्रमांकाची मते मिळविली आहेत. जिल्ह्यात केवल रावेर लोकसभेची जागा लढविण्यात आली होती. यावेळी वंचित आघाडीचे उमेदवार नितीन कांडेलकर यांनी भुसावळ विधानसभा मतदार संघात- १५,६३९, रावेर- १३, ६२९, जामनेर- ९,५७१, चोपडा- ५,९३१, मलकापूर-२०,७०२ तर सर्वाधिक २२, ६३६ मते मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून मिळविली होती. तब्बल ८८ हजार ३६३ इतकी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्याने राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या होत्या. यात दलित समाजातील मतांचा अधिक भरणा होता. तर मुस्लिम समाजाने कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्या पारड्यात मतदान टाकले होते. डॉ. पाटील यांना भुसावळ विधानसभा संघातून ४४,५०६ मते मिळाली आहेत. यात जवळपास ८० टक्के मतदान मुस्लिमबहुल भागातून झाले आहे. नेमक्या याच मतांवर ‘एमआयएम’चा डोळा असून, भुसावळच्या जागेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. 

भुसावळसाठी इच्छुकांची गर्दी 
भुसावळ विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. त्यामुळे दलित समाजाला विधानसभेत नेतृत्वाची संधी असून, वंचित आघाडीला दलित समाजाचा वाढता पाठिंबा लक्षात घेता, वंचितकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे. युती आणि आघाडीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचा देखील वंचितकडे उमेदवारीसाठी पाठपुरावा सुरू आहे. यामध्ये नगरसेवक रवींद्र सपकाळे, जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांसह डॉ. मधू मानवतकर यांच्याही नावाची चर्चा आहे. तर एमआयएमकडून जगन सोनवणे, नगरसेवक रवींद्र सपकाळे यांनी देखील मुलाखती दिल्या आहेत. 

‘वंचित’चे इच्छुक 
रावेर विधानसभेसाठी मनोज कापडे, मुक्ताईनगर- विनोद पाडर, नितीन कांडेलकर, ॲड. राहुल पाटील, छाया सावळे, जामनेर- प्रभाकर सावळे, अमरसिंग चव्हाण यांनी वंचित आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com