भुसावळ रेल्वे यार्डात मालगाडीचे डब्बे घसरले; १५ गाड्या धावल्या उशिराने

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

आरओएच रेल्वे यार्डात रेल्वे रुळ क्रॅक असल्यामुळे मालगाडीचे सात डब्बे रुळावरुन अर्धा मीटर अंतरावर घसरत गेले. विशेष म्हणजे ही घटना मुख्य लाइनवरच झाल्याने अनेक गाड्यांना स्थानकावर तर काही गाड्यांना यार्डातच थांबविण्यात आल्या.

भुसावळ : मुंबईकडून नागपूरकडे जाणाऱ्या मालगाडीचे सात डबे रुळावरुन घसरल्याची घटना आज (ता. १५) सकाळी ६.५५ वाजेच्या सुमारास आरओएच यार्डात मुख्य लाईनवर घडली. तब्बल चार तास रेल्वे वाहतुक ठप्प झाल्याने पंधरा गाड्या उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. अकरा वाजेच्या सुमारास मालगाडी रुळावरुन हटवून चाचणीनंतर रेल्वे वाहतुक सुरळीत करण्यात आली. 

हेपण पहा - "लालपरी'ला जडला "कोरोना व्हायरस'!

येथील आरओएच रेल्वे यार्डात रेल्वे रुळ क्रॅक असल्यामुळे मालगाडीचे सात डब्बे रुळावरुन अर्धा मीटर अंतरावर घसरत गेले. विशेष म्हणजे ही घटना मुख्य लाइनवरच झाल्याने अनेक गाड्यांना स्थानकावर तर काही गाड्यांना यार्डातच थांबविण्यात आल्या. घटनेची माहिती कळताच एडीआरएम मनोज सिन्हा, सिनीअर डीएमइ लक्ष्मीनारायण यांसह आरपीएफ व ब्रेक डाऊन पथक घटनास्थळी पोहोचून घसरलेल्या मालगाडीच्या डब्यांना उचलण्याचे कार्य सुरु केले. यानंतर साडेदहाला मालगाडीचे डब्बे मुख्य लाइनवरुन हटविण्यात रेल्वेच्या पथकास यश आले. यानंतर चाचणी घेऊन अकराच्या सुमारास ही लाइन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. मुख्य लाइनवर झालेल्या अपघातामुळे दिल्लीकडून व नागपूरकडून येणाऱ्या वाहतुकीला तब्बल चार तास खोळंबा झाला आहे. यामध्ये गोदाम, पटना, गोवा, दुरातो, नवजिवन, गोरखपूर या गाड्या उशिराने धावल्या. 
 
प्रवाशांचे हाल 
मालगाडीचे डबे घसरल्यामुळे तब्बल १५ गाड्या प्रभावित झाल्या. या गाड्या तीन ते चार तास उशिराने धावल्या. यामुळे २२१३९ पुणे-अजनी हमसफर, ११०५७ मुंबई- अमृतसर पठाणकोट, १२८११ मुंबई-हटीया, भुसावळ बडनेरा मेमू, १२६५६ नवजीवन एक्सप्रेस रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या. तर अन्य गाड्यांना ठिकठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या गाड्या उशिराने धावल्या, त्यामुळे प्रवाशांसह चाकरमान्या वर्गाचे हाल झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal railway yard Luggage compartment wheel rail