पाडे, तांड्यांवर लाखोंचा खर्च करुनही तहान भागेना 

live photo
live photo

भुसावळ : गेल्या काही वर्षांपासून नियोजन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे शहरासह तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. पाण्याअभावी जनजीवन प्रभावित तर झालेच आहे, पशुपक्षांचे देखील पाण्यासाठी हाल होत आहेत. तापी नदीच्या काठावर असलेले कंडारी हे गाव केवळ उन्हाळ्यातच नव्हे, तर बारमाही दुष्काळी गाव म्हणून नोंद झाली आहे. लाखो रुपये खर्च करूनही ग्रामस्थांना घोटभर पाणी मिळत नाही. अशी विदारक स्थिती निर्माण झालेली आहे. 

‘पाणी हे जीवन आहे’ याचा अर्थ केवळ उन्हाळ्यातच समजतो, इतर वेळी पाणी बचतीसाठी कुणीही काही एक उपाय करताना दिसत नाही. वारेमाप पाण्याचा उपसा केला जात आहे. जलसंधारणाची कामे अर्थात ‘पाणी आडवा पाणी जिरवा’, जलयुक्त शिवार आदी योजनांची कामे तालुक्यात अद्यापही झालेले दिसून येत नाही. एकेकाळी पाण्यासाठी मुबलक जलस्रोत असलेला तालुका दुष्काळी जाहीर झाला आहे. भुसावळ तालुक्यातील शिंदी, शिवपूर कन्हाळा, महादेव तांडा या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. या सर्व गावांमध्ये पंचायत समिती मार्फत टॅंकरच्या फेऱ्या करून कसातरी पाणीपुरवठा केला जात आहे. या शिवाय शिंदी, कन्हाळे, खेडी, चोरवड, टाकळी, काहूर खेडा, मांडवेदिगर, मोंढाळा व खंडाळा या गावांमध्ये जलस्रोत असलेल्या खासगी विहिरींचे अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. एका विहिरीसाठी सहाशे रुपये रोज तर पाण्याच्या टँकरसाठी १२ ते १५ हजार रुपये दररोज असा खर्च करावा लागत आहे. शिंदी या गावाला पाण्याची मोठी टंचाई असते, ही समस्या दूर होण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून वेल्हाळे तलावानजीक विहीर खोदलेली आहे. या विहिरीवरून पाइपलाइनद्वारे पाणी शिंदी गावात आणण्याचे काम सुरू असले, तरी या उन्हाळ्यात हे काम पूर्ण होईल, याची शक्यता कमी आहे. सध्या या विहिरीचे पाणी जाडगाव, मन्यारखेडा व मोंढाळे या गावांसाठी वापरले जात आहे. महादेव माळ या गावाला राष्ट्रीय पेयजल योजनेतून तसेच कन्हाळे या गावास पाणी मिळण्यासाठी कामे हाती घेतलेली आहे. तसा कृती आराखडा देखील तयार केलेला असून, पुढच्या वर्षी या गावांचा किमान पाण्याचा प्रश्न तरी मार्गी लागणार आहे. 

दहा लाखातून पाण्याचा थेंबही नाही 
आदिवासी पाडे व तांड्यांवर यावर्षी तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. कुऱ्हे पानाचे येथून जवळच असलेल्या महादेव तांडा हे बंजारा लोकवस्तीचे एक गाव आहे. पाणी समस्या कायमस्वरूपी मिटावी, यासाठी मनरेगा योजनेतून विहीर खोदण्याचा देण्यात आलेला आहे. ४ लाख रुपये खर्चाची विहीर खोदण्यासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. लाखो रुपये खर्च करुन देखील विहिरीतून थेंबभर पाणी मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या अशा अजब-गजब कारभाराचे परिसरात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

कंडारीकर तहानलेलेच 
बारमाही वाहणाऱ्या तापी नदीच्या काठावर कंडारी हे गाव आहे. या गावात वर्षभर टँकरने पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणच्या महत्त्वाकांक्षी योजनेत गावाचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेचे अंदाजपत्रक देखील ग्रामपंचायतीने केलेले आहे. मात्र, तीन वर्षांपासून तसेच प्रलंबित असल्याने कंडारीकर तहानलेले आहेत. एकूणच लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या गावात टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. 

सोळा वर्षापूर्वीच्या कूपनलिकेस केले पुनर्जीवित 
भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्याशेजारी सोळा वर्षांपासून बंद असलेल्या कूपनलिकेस स्थानिक रहिवाशांनी पदरमोड करुन पुनर्जीवित केले आहे. या कूपनलिकेतून पाणी आल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या भिंतीलगत सोळा वर्षापूर्वी तत्कालीन खासदार (स्व.) वाय. जी. महाजन यांच्या खासदार निधीतून कूपनलिका उभारली होती. कालांतराने ती बंद पडली. याठिकाणी अतिक्रमण असल्याने ती झाकली गेली होती. मात्र, परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांना सांगून कूपनलिका पुनर्जीवित केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com