ग्रामीण भागात कोरोना सक्रिय होतोय ..लॉकडाऊन गांभिर्याने घेण्याची गरज 

ग्रामीण भागात कोरोना सक्रिय होतोय ..लॉकडाऊन गांभिर्याने घेण्याची गरज 

भुसावळ : ग्रामीण भागात कोरोना आपले हातपाय विस्तारू लागला आहे. काल (ता. १९) वरणगाव, सावदा शहरासह यावल आणि जामनेर तालुक्यांत सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीने आरोग्य विभागापुढे असलेले आव्हान आता अधिक गडद झाले आहे. दरम्यान, यावल तालुक्यातील एकूण सात रुग्ण सापडले असून, ही गावे सील केली. ग्रामीण भागातील अनेक गावातून आजही ‘लॉकडाऊन’ला जनतेकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याने जनतेने आता अधिक काळजी घेणे गरजेचे बनले आहे. 

वरणगावात एक रुग्ण 
वरणगाव: शहरातील गंगाराम नगरमध्ये ५० वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. प्रतिभा नगरचा भाग पूर्णपणे सील करुन, रुग्णाच्या घरातील चार व्यक्तींना जळगावला तपासणीसाठी पाठविण्यात आले. या पॉझिटीव्ह रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये एक महिला प्रसूती झाली असून, ज्या डॉक्टरांकडे प्रसूती झाली त्यांचाही शोध घेण्याचे काम सुरू आहे. तर प्रतिभा नगरात पुन्हा आशा वर्करच्या माध्यमातून नव्याने सर्वे करण्यास सुरुवात करण्यात आली असून, तीन नविन संशयीतांना जळगाव येथे पाठविण्यात आले आहे. 

यावल तालुक्यात सात रुग्ण 
यावल : तालुक्यात फैजपूर, कोरपावलीपाठोपाठ आता शहरात कोरोनाने शिरकाव केला आहे. शहरातील ५८ वर्षीय महिलेसह वीस वर्षीय युवक तर दहिगाव (ता. यावल) येथील ६८ वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. शहरातील सुदर्शन मंदिर सिनेमा चौक आणि पूर्णवाद नगरातील पाचशे मीटरपर्यंतचा भाग परिसर सील करण्यात आला आहे. सोमवारी (ता. १८) कोरपावली येथील दोन तर त्यापूर्वी फैजपूर येथील दोन असे आतापर्यंत तालुक्यात सात जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

सावद्यात दोन पॉझिटीव्ह 
सावदा : येथील स्टेशन नाका जवळील एक ६० वर्षीय महिला व गांधी चौकातील ५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. दोघं रुग्णाचे परिसर सील करुन, त्यांच्या कुटुंबातील १५-२० जणांना शहरातील कोरोना केअर सेंटर मध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

जामनेर तालुक्यात एक रुग्ण 
जामनेर : पळासखेडा बुद्रुक (ता. जामनेर) येथील एका रूग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. रुग्णाच्या संपर्कात लोकांना क्वारंटाईन करुन, परीसरातील काही भाग सील करण्यात आला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com