esakal | हरिण पकडले अन्‌ भरभर झाडावर चढला...नागरीकांनी अनुभवला जंगलातील थरार 
sakal

बोलून बातमी शोधा

bibtya

शेतीशिवारालाच लागून जंगल आहे त्यामुळे शेतात जाताना एकटे जावून नये. जमावाने जावे तसेच मोठ मोठ्याने आवाज करत जावे. वन्य प्राणी आढळून आल्यास वन विभागाशी संपर्क साधावा. 
- अमोल चव्हाणश्‍ वन परिक्षेत्र अधिकारि, वढोदा वनक्षेत्र 

हरिण पकडले अन्‌ भरभर झाडावर चढला...नागरीकांनी अनुभवला जंगलातील थरार 

sakal_logo
By
डॉ. गजानन खिरळकर

कुऱ्हा काकोडा (ता. मुक्ताईनगर) : भोटा - तालखेडा शिवारातील एका शेतात बिबट्याने हरिणाला ठार मारले व उंच झाडावर नेवून फस्त केल्याचा प्रकार सकाळी उजेडात आला. यामुळे शेतशिवारात कमालीची दहशत निर्माण झाली असून जंगलातील थरार आता शेती शिवारात घडला असल्याने शेतकऱ्यांसह समान्य जनतेचा जीव टांगणीला लागला आहे. 

हेपण वाचा - रेल्वेने मंगळवारी मुंबई, सुरतला जाताय...अगोदर हे पहा

सदर घटनेची तालखेडा गावात याची चर्चा झाल्यानंतर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख नवनीत पाटील यांनी वन विभागाचे वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण यांना फोन करून ही घटना सांगितली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सुप्रिया देवरे, विजय अहिरे, वन मजूर अशोक तायडे, रमेश खिरळकर, राजू खिरळकर यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. खाण्याच्या पद्धतीवरून त्यांनी सदर शिकार बिबट्याने केली असल्याचे मान्य केले. 

डोळ्यादेखत उतरला बिबट्या 
तालखेडा शिवारास लागुनच असलेल्या भोटा शेती शिवारातील गट क्र. 160 ह्या मधुकर पाटील (रा. कुऱ्हा ) यांच्या शेतात बिबट्याने हरीणला ठार मारले. आज सकाळी मधुकर पाटील यांचा मुलगा विशाल पाटील शेतातील ठिबक नळ्या उचलण्याचे काम करत होता तसेच शेजारीच उमेश ढोले हे देखील शेतात काम करत होते. तेव्हा शेतातील झाडावरून त्यांना बिबट्या खाली उतरताना दिसला. बिबट्याने हरीणला ठार करून कडूनिंबच्या झाडावर घेवून गेला आणि तिथे फस्त केल्याचे संबंधित शेतकऱ्याच्या लक्षात आले. दोघे जण घाबरून त्याठिकाणाहून पळून आले. 


शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण 
दिवसेंदिवस शेती शिवारात हिंस्र प्राण्यांचा वावर वाढत असून वन्य प्राण्यांसह पाळीव प्राणी सुद्धा ठार केले जात आहे. काही दिवसांपुर्वी पारंबी शिवारात गोऱ्हा ठार झाला होता. त्यानंतर कोऱ्हाळा थेरोळा शेती शिवारात बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले करून ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतक-यांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतक-यांना रात्री ऐवजी दिवसाची लाईन कायमस्वरूपी द्यावी अशी मागणी होत आहे. 

वन्यप्राण्यांकडून नुकसान 
तृणभक्षी व मांसभक्षी प्राणी शेतीशिवारात फिरून शेती पिकाचे नुकसान करत आहे मात्र वन विभाग झालेल्या नुकसानीची भरपाई अतिशय कमी प्रमाणात देत आहे. वण्यप्रण्यांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असताना शेतक-यांना मिळणारी भरपाई अत्यल्प असल्यामुळे शेतक-यांनी कसे जगावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.  

loading image