देखण्या पंचवटीच्या स्वागताला शोककळेचे गालबोट,बीपीन गांधी यांचे निधन 

residenational photo
residenational photo

नाशिकः तब्बल 42 वर्षानंतर आज बुधवार (ता.9) पंचवटी एक्‍सप्रेस नवीन रुपात येणार होती. नवे अद्यावत रुप पहायला सगळेच रेल्वेस्थानक सज्ज होते. भल्या पहाटेपासून नाशिक रोड स्थानकात फलाटावर मिठाई, स्वागत फलक, हार बुके अशी सगळी तयारीही झाली होती. लोकप्रतिनिधी प्रवाशी सगळ्यांची वर्दळ वाढली होती. आदर्श मॉडेल म्हणून नावारुपाला आणण्यासाठी तब्बल तेरा वर्षापासून प्रयत्नशील असलेल्या एसी-3 कोचमधील रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी व त्यांच्या सहप्रवाशांची देखण्या पंचवटीचे स्वागतासाठी धामधूम सुरु असतांना, फलाटावर जमलेल्या उपस्थितीतांच्या गराड्यात गांधी यांचा हदयविकाराने मृत्यु झाला. 

पंचवटी फलाटावर येण्यापूर्वी 10 मिनीटे आधीच अतिशय चटका लावणाऱ्या या मृत्युने क्षणात रेल्वे फलाटावर शोककळा पसरली. ढोल वाजलाच नाही. फलक फडकला नाही. हार फुले, गाडीऐवजी मृतदेहांवर पोहोचले. क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि देखण्या पंचवटीला स्वागताला शोककळेचे गालबोट लागले. 

पंचवटीचा एसी-3 डबा भारतीय रेल्वे वाहातूकीतील प्रवाशी आचरणाचा आदर्श नमूना म्हणून तब्बल पाच वर्षापासून "लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडमध्ये नोंदला जातो आहे. 

प्रत्येक सीटला कुशन, खिडक्‍यांना पडदे, स्वयंपूर्ण स्वच्छतेत प्रवाशांचा पुढाकार, कसारा स्थानकांपर्यत पेपर वाचन, त्यानंतर वीज बंद करुन सक्तीने विश्रांती, ठराविक तास मौन, या आणि अशा अनेक पायंडे पाडले होते. पंचवटीतील या प्रवाशांच्या सातत्यपूर्ण प्रवासाची रेल्वेने दखल घेत, रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी पंचवटीला नवीन डबे मंजूर केले. आजपासून नवीन डब्यांची पंचवटी धावणार असल्याने ही पंचवटी रेल्वे प्रवासासाठी आदर्श मॉडेल बनविण्याचे स्वप्न घेउन रेल परिषदेचे काम सुरु होते. 

पंचवटी हाच ध्यास 
व्यवसाय मुलांकडे सुर्पूद केल्यानंतर गांधी यांनी पूर्णपणे पंचवटीच्या कामासाठी स्वताला झोकून दिले होते. डबा आदर्श केल्यानंतर पंचवटी आदर्श करण्यासाठी प्रयत्नशील गांधी यांच्या पाठपुराव्याला रेल्वेने सगळे नवे डबे देउन प्रतिसाद दिल्यानंतर त्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. या आनंदात ते काल झोपलेही नसल्याचे त्यांचा सहकारी संजय बोरसे (डॉलर) यांनी सांगितले. सकाळी पावने सात वाजले तरी, डोलवाले कसे दिसत नाही म्हणून त्यांनी राजेश फोकणे यांना त्याविषयी विचारणा केली. पुजा लाहोटी या सहप्रवाशीने त्यांना स्वागत फलक दाखविला. पत्रकारांशी ते बोलून फिरले. गर्दीत गप्पा मारत असतांनाच, काही कळण्याच्या आत धाडकन कोसळले. 

मृत गांधी संसरी नाक्‍या जवळील गायत्रीधाम येथे रहायला होते. ते मूळ कच्छ गुजरात राज्यातील बिदडा येथील होते. अलिकडे काही महिण्यापासून ते वारंवार गावाकडे जात. याच दरम्यान त्यांनी गावाकडे अंत्यसंस्कार करण्याची त्यांचा मुलगा राज याच्याकडे इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या मागे पत्नी दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या इच्छेनुसार कच्छ (गुजरात) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. 

परस्पर सहकार्याचा दुवा 
रेल्वे प्रशासन आणि प्रवाशी यांच्या परस्पर सहकार्यातून पंचवटी मॉडेल रेल्वे गाडी बनविण्याचा हा प्रवास आज बुधवार (ता.9) पासून खऱ्या अर्थाने सुरु होणार होता. रेल्वेने नवे डबे दिल्याने मनोबल उंचावलेल्या प्रवाशांनी आज तिच्या नव्या रुपांचे स्वगात करण्यासाठी नाशिक रोड स्थानकावर भले पहाटेपासून जोरदार स्वगताची तयारी केली होती. 


स्थानीक लोकप्रतिनिधीना आमंत्रित केले होते. ढोल ताशा, मिठाई, स्वागत फलक, हार, बुके, पंचवटीच्या स्वागताची धामधूम सुरु असतांना, माजी मंत्री बबनराव घोलप, डॉ.कैलास कमोद, रेल्वेच्या भुसावळ विभागाचे उप महाप्रबंधक सुनील मिश्रा, देविदास पंडीत, स्टेशन प्रबंधक आर.के.कुठार, एचएएल युनियनचे माजी सरचिटणीस रामभाउ जाधव, गुरुमित रावल, पूजा लाहोटी, राजेश फोकणे,नितीन चिडे, सुनील आडके, अशोक बोरसे (डॉलर),नंदू गोसावी, पत्रकार आदीच्या गराड्यात बोलत असतांना गांधी यांना हद्यविकाराचा झटका येउन ते कोसळले. स्टेशन प्रबंधक श्री कुठार यांनी स्ट्रेचर व रुग्णवाहिका बोलावून घेत त्वरीत जयराम रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्वरीत हलविलेही. पण रस्त्यातच गांधी यांचा मृत्यु झाला. 

प्रवाशांची आचारसंहिता 
1 मे 1975 ला मनमाड मुंबई पंचवटी एक्‍सप्रेस सुरु झाली. तेव्हापासून नाशिक मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांची पंचवटी ही लाडकी एक्‍सप्रेस आहे. एसी-3 डब्याला 5 वर्षे आदर्श डब्याचा पुरस्कार मिळाला आहे. नाशिक ते कसारा इथंपर्यत प्रवाशी दिवे सुरु ठेवतात. तेवढ्या वेळेत चहा-पाणी, पेपरवाचन, परस्परांशी संवाद असा डब्यातील आचरणाचा एक दिनक्रम आहे.इतर डब्यात गणेशोत्सवापासून विविध उत्सव साजरे होतात. स्वताच प्रवाशी तिची स्वच्छता ठेवण्यासह विविध उपक्रम राबवितात. कसारा ते मुंबई दरम्यान हे प्रवाशी विश्रांती घेत इतरांना त्रास न होता प्रवास करतात. आदर्श प्रवाशी आचरण या संकल्पनेवर डब्याचा व आता गाडीचा लौकीक वाढविण्याचा रेल परिषदेचा प्रयत्न होता. बिपीन गांधी यांच्या त्यासाठी सर्वाना सोबत घेउन प्रयत्न करायचे. 

अशी आहे नवीन रेल्वे 
नवीन रुपातील पंचवटीला 22 डबे आहेत त्यात 2 पेन्ट्री कार आहे. सीटची रचना पूर्वीपेक्षा कमी रुंदीची केली आहे. दोन सिटांच्या मध्ये नाश्‍ता ठेवण्यासाठी छोटे खानी टेबल केला आहे. एन्ड ऑफ जनरेशन (ईओएन) रचनेने तिचे डबे वजनाने हलके केले आहे. डब्यांची रचना पूर्णपणे आधुनिक आहे. प्रत्येक सीटलगत टेबल, मोबाईल चार्जर सोय आहे. डब्यातील विद्युत व्यवस्था बदलली आहे. सामान ठेवण्याचे डब्यातील कॅरेज मोकळे व सुटसुटीत आहेत. पंचवटी एक्‍सप्रेसमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा हेही नवीन 
गाडीचे नाविण्य आहे. प्रवाशी वाहातूकीसाठी आता 20 डब्याची सोय आहे. भविष्यात गाडीची गती वाढविण्यासाठी आवश्‍यक असे तांत्रीक बदल केलेले आहेत. 

गांधी यांची अखेरची इच्छा 
हद्यविकारांपूर्वी गांधी पत्रकारांशी बोलले. "एसी-3 कोच आदर्श झाला पण आता, पंचवटी गाडीच देशात आदर्श रेल्वे ओळखली जाईल. प्रवाशांचे वर्तन कसे असावे. याचा उत्तम नमूना म्हणून पंचवटी नावारुपाला आणण्याचे प्रयत्न राहील. प्रवासातील आचार,विचार सगळे इतरांना अनुकरणीय वाटले पाहिजे. असे स्वप्न असल्याचे गांधी यांनी 
सांगितले. 

शब्दात व्यक्त न करता येण्यासारखी घटना आहे, आयुष्यभर गांधी यांनी पंचवटीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. ज्यासाठी इतके वर्षे खटाटोप केला. तो क्षण काही मिनीट 
जवळ येउन ठेपला असतांना "अकल्पनीयरित्या त्यांचे जाणे धक्कादायक आणि दुःखद आहे. रेल्वे प्रशासन त्यांच्या परिवाराच्या दुखात सहभागी आहे. 
आर.के.सिन्हा (वरिष्ठ वाणिज्य उप महाप्रबंधक भुसावळ विभाग) 

पंचवटीला नवीन डबे मिळावे म्हणून पराकाष्ठा करुन गांधी यांनी प्रयत्न केले. प्रयत्न फाळाला आल्याने दोन दिवसांपासून त्यांचा उत्साहाला पारावार राहिला नव्हता. गाडीला 
झेंडा दाखविणे बाकी असतांनाच, त्यांचा मृत्यु न विसरता येणारा आहे. पंचवटी एक्‍सप्रेस देशभर प्रसिध्द करण्यासह पुढाकार घेउन काम करणारे हुन्नरी व्यक्तीगत गमावले 
-बबनराव घोलप (माजी मंत्री) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com